उद्यापासून 'अभाकोंप' चे 32 वे अधिवेशन मालवणात ;अखिल भारतीय कोंकणी परिषदेसाठी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण सज्ज..!
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उद्घाटक तर आमदार वैभव नाईक व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर आहेत ‘मानाचे सोयरे ; ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो प्रमुख अतिथी…
मालवण | प्रतिनिधी : अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे ३२ वे अधिवेशन मालवण शहरातील धुरीवाडा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे १४ व १५ मे रोजी होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
दोन दिवसांच्या या अधिवेशन काळात विविध पुस्तकांचे प्रकाशन, ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार, परिसंवाद, कवि संमेलन यासह अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती परिषदेच्या अध्यक्षा उषा राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी परिषदेचे सचिव गौरीश वेर्णेकर, रुजारिओ पिंटो, रेनॉल्ड भुतेलो आदी उपस्थित होते. कोंकणी अधिवेशनाचे उद्घाटन १४ मे रोजी सकाळी दहा वाजता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, ज्येष्ठ लेखक अरूण उभयकर, श्रीमती सुफला गायतोंडे आदी विशेष व सन्माननीय अतिथी आहेत.
याच दिवशी दुपारी साडे बारा ते दिड यावेळेत गोवा सरकार प्रशासन आणि केंद्रीय आस्थापनांत कोंकणी भाषेचा वापर, स्थिती आणि कृती या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी तीन ते साडे चार यावेळेत कवि संमेलन होणार आहेत. साडे चार ते साडे पाच यावेळेत गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रातील कोंकणी शिक्षण या विषयावर चर्चासत्र असेल. साडे सहा ते साडे आठ यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
१५ मे रोजी सकाळी साडे नऊ ते साडे दहा यावेळेत घाटमाथ्यावरील कोंकणी भाषा आणि संस्कृती यांचे संवर्धन या विषयावर चर्चासत्र होईल. साडे दहा ते साडे अकरा यावेळेत ज्येष्ठांचे कवि संमेलन होणार आहे. यात जिल्ह्यासह गोव्यातील कवि सहभागी होणार आहेत. साडे अकरा ते साडे बारा यावेळेत कोकणातील किनारपट्टी भागातील कला, व्यवसाय या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी अडीच ते साडे तीन यावेळेत या अधिवेशनाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमास अरूण उभयकर, हेमा नाईक, व्हिंक्टर डांटस, रेनॉल्ड भुतेलो, जेम्स फर्नांडिस आदी उपस्थित राहणार असल्याची माहितीही राणे यांनी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)