माजी मुख्याध्यापक शरद गोवंडे कालवश...!
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे देऊळवाडा खेरवंद येथील रहिवाशी, आदर्श शिक्षक आणि भरतगड हायस्कूल देऊळवाडा नंबर २ चे माजी मुख्याध्यापक, शरद रामेश्वर गोवंडे ७१ वर्षे यांचे रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. रविवारी दुपारी एक वाजता खेरवंद येथील स्मशानभूमीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिवंगत शरद गोवंडे यांनी भरतगड हायस्कूल देऊळवाडा नंबर २ आणि आर पी बागवे हायस्कूल मसुरे येथे शिशक आणि मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली होती. तसेच मसुरे एज्युकेशन सोसायटी लोकल कमिटीचे ते अध्यक्ष, सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले होते. मसुरे गावच्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव अशी कामगिरी केली होती. अनेक विद्यार्थी घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मसुरे गावच्या सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्येही त्यांचे योगदान मोठे होते. अनेक गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केली होती. गावामध्ये नेहमी सुसंस्कृत पणे आणि सर्वांशी मिळून मिसळून ते वागत असत. नाट्य, सामाजिक क्षेत्राचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, पत्नी, भाऊ, बहीण, भावजय असा मोठा परिवार असून येथील युवा कार्यकर्ते सचिन आणि हेमंत गोवंडे यांचे ते वडील तर प्रमोद गोवंडे यांचे ते भाऊ होत.
शरद गोवंडे यांच्या निधनाने मसुरे गावामध्ये व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)