ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या मुलांना मुलिंचा नकार का….?

ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या मुलांना मुलिंचा नकार का….?

प्रकाशन: 09 Apr 2022 11:34 AM
वाचन संख्या 446

युवा चॅलेंजर ( साप्ताहिक सदर)
भाग २.
….

विवाहोत्सुक युवा वर्गाला खरं तर या प्रश्नाची चार ओळींची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करताना लक्षात येतं की मेंदूला वणवण फिरवून त्यात हाती जी काही उत्तरे सापडतात ती जास्त विचार वाढवणारीच ठरतात.

आजच्या गतीशील दुनियेत यावर वेळेअभावी साग्रसंगीत विचार करणेही शक्य नाही…म्हणजे विचारही झटपट करावा लागतो अगदी, रजिस्टर लग्नासारखा..! यात कोणाची बाजू घेण्याचा किंवा मांडण्याचा प्रश्नच  नाही. सर्व बाजुंनी लिहिण्याचा प्रयत्न आहे.

गेल्याच महिन्यात लग्न होत नाही म्हणून स्वतः जाळून घेऊन आत्महत्या केलेल्या एका तरुणाची बातमी ऐकली. वाईट वाटले. ही समस्या आणि गोष्ट एकाच गावाची नाहीय. प्रत्येक गावात, वाड्यांवर हीच समस्या आहे. गावात राहणाऱ्या, तेथे उदरनिर्वाह करणाऱ्या, विवाहाला इच्छुक असणाऱ्या मुलांशी बहुतांश मुली का लग्न करत नाहीत?  हा खरं तर देशस्तरीत प्रश्न झाला आहे. नेशन वॉण्टस टू नो, कॅटेगरीतला.याची उत्तरं बहुधा ही असावीत.

चार – चौघात चर्चा करताना प्रत्येक आई -बापाला  एक प्रतिष्ठा, एक दर्जा हवा असतो.त्यात नात्यांद्वारे मिळवलेला दर्जा बऱ्याच जणांना प्राप्त करायचा असतो आणि यात काही गैर आहे असं नाही. तुझा जावई कोण आहे? कुठे राहतो? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं प्रत्येकाला द्यायची असतात. या सर्व प्रतिष्ठित विचारांच्या जमान्यात  गावात स्थायिक असलेल्या मुलांच्या बायोडाटावर पाहिल्याबरोबरच रिजेक्टचा स्टॅम्प मारला जातो.समाजाचं हे वागणं कितपत योग्य आहे, आणि मुलीचं आयुष्य सुसह्य, उत्तम करण्याचा हाच मार्ग आहे का? हा देखील मोठा प्रश्न आहेच.

कोकणात बहुतांशी,  ‘मेल्या गावाक रवलंस तर तुका पोरग्या कोण देईत?’असा काहीसा  प्रश्न विचारला जातो. मग मुले केवळ लग्न व्हावे म्हणून पुण्या -मुंबईची वाट धरतात. त्यात स्वतःची रूम हवी असल्याने बँक लोन, गावातील वडिलोपार्जित जमीन विक्री अशा कसरती करून घरं (वन आरकेचं शहरातील विश्व )
घेतलं जात.आर्थिकदृष्टीने बरेंच काही गमवून. हे करून देखील नवरा -बायको यांचे नाते चांगले राहिले तर उत्तमच आहे.

ग्रामीण भारतात शेती हे मुख्य उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे. (बहुतेक जणांचा उदरनिर्वाह त्यावर होत नाही किंवा त्यांना करता येत नाही. )काहीच जण शेती व्यवसाय म्हणून करतात. बऱ्याच ठिकाणी शेती ही अतिश्रमाची, तोट्याची, कमी प्रतिष्ठा असलेली आहे, असा मुलींच्या आणि त्यांच्या पालकांचा गैरसमज आहे. तसेच, जे स्वतः शेती करतात त्यातील काही जण शेतीबद्दल नकारात्मक बोलतात. मुळात आपल्या देशाची अर्थव्यवस्था ज्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, त्या शेती आणि शेतीपूरक व्यवसायांनाच प्रतिष्ठा प्राप्त नाही. तर ते करणाऱ्यांना कुठे इज्जत मिळणार? त्यासाठी शेतीत करियर आहे हे अधोरेखित व्हावं लागेल.

आयुष्यात आर्थिक सुरक्षितता प्रत्येकालाच हवी असते. मुलींना ती अपेक्षा करावी याबाबत चुकीचं असं काहीचं नाहीय. पण या अपेक्षांना मर्यादा असावी.

मुलींना किंवा त्यांच्या पालकांनाच सर्व दोष देता येणार नाही.गावात राहणाऱ्या आणि लग्न न जमणाऱ्या मुलाची देखील स्वतः च्या बहिणीचं लग्न शहरात व्हावं हीच इच्छा असते. असं कसं चालेल भावा?  गावाची लायकी तुला वाढवायची आहे, तर तुझी सामाजिक किंमत वाढणार आहे. मुळात गावात राहणाऱ्या तरुणांनी गावात आर्थिक वातावरण सकारात्मक करण्याचा प्रयत्न करावा. काहीच जमत नाहीय म्हणून गावी राहिलोय अशी मानसिकता असणं चुकीचं. पूर्वी गावी लग्नाला मुली मिळत होत्या, तेव्हा इंटरनेट मिळत नव्हतं. आता इंटरनेट मिळतंय पण  मुली मिळत नाहीयेत. यातही सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज आहे. इंटरनेटच्या मदतीने गावांचा खरा विकास होणार आहे. शहर आणि गाव यांच्यातील दरी थोडी का होईना कमी होण्यास मदत होणार आहे. जेवढी शहर आणि गाव जवळ येतील, तितकी माणसं जवळ येतील, तितकीच नाती देखील जुळतील.

शेवटी गावात कोणी तरी शिल्लक राहणे गरजेचे आहे. गाव टिकले तर शहरं उपाशी राहणार नाहीत.निराश करणाऱ्या सरकारी धोरणांच्या काळातही गावांनी आपली आर्थिक सुब्बता वाढवावी आणि शहरात राहणाऱ्या प्रत्येकाने विशेतः स्त्रियांनी गावाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा तरच गाव आणि शहर यांची ही गाठ बांधणे शक्य होईल. ती ब्रम्हदेव बांधणार नाही, तुम्हा आम्हालाच हे करावं लागेल.

प्रश्न युवक व युवतीचा नाहिय तर एकंदर ग्रामीण रचना किती व कशी मानवी जीवनालाच पोषक आहे त्याची जाणीव घेण्याचा आहे.
स्वतःला बदलता येत नाही हे खरे आहे…पण ग्रामीण भागाबद्दल विचार बदलणे चॅलेंज असेल….युवा पिढीसाठी…आपल्यासाठी.

तर घेताय ना हे चॅलेंज आणि बनाच एक सच्चे युवा चॅलेंजर…!

लेखन : रोशन चिंचलकर (पळसंब,सिंधुदुर्ग)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स