पॉलिटिक्स बिलिटीक्स…!
युवा चॅलेंजर (साप्ताहिक सदर) : भाग पाचवा
लेखन : रोशन चिंचवलकर (पळसंब,सिंधुदुर्ग)
राजकारण हा भारतीय लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे. देशाचे वर्तमान ,भविष्य व प्रगती यांवर राजकारणाचा मोठा प्रभाव आहे.
एक गोष्ट मात्र नेहमीच खटकते देशातील तरुण पिढी राजकारणाबाबत नकारात्मक बोलताना दिसते. मित्रांनॊ, ज्या विषयाचा तुमच्या आयुष्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक भागावर थेट परिणाम होतोय. त्याबाबत आपण इतके निष्काळजी असू नये.
कोकणातील तरुण पिढीबाबत देखील हेच बोलता येईल. आपले जिल्हे हे विविध तालुके, तालुक्यातील गाव, गावातील वाड्या अशा संरचनेचे आहेत. त्या अनुषन्गाने लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या स्तरावर निवडणुका होतात. पण अशा निवडणुकांमध्ये तरुणांचा सक्रिय सहभाग किती आहे? ही पण पडताळून पाहण्यासारखी गोष्ट आहे.
राजकारण हा कोकणातील चर्चेचा एक महत्वाचा विषय आहे. इथले नागरिक ओबामा आणि ट्रम्प यांना सल्ले द्यायला मागे पाहणार नाहीत.हॉटेल मध्ये घोळका करून, बाकड्यावर बसून कटिंग चहा मागवून त्या चहाबरोबर एक प्लेट भजी आणि देशाचं राजकारण चघळलं जातं. परंतु, राजकारण गावपातळीवर सर्वव्यापी असताना कोकणात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उमेदवार धरून उभे केले जातात ही परिस्थिती आहे. राजकारण आम्हाला नको हीच इथल्या बहुसंख्य तरुणांची मनस्थिती असते. असं कसं चालेल मित्रांनो?
सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित संपूर्ण कोकणासमोर अनेक आव्हानू आहेत. व्यवसाय, दळणवळण, पर्यावरण याबाबतीत अनेक प्रश्न आहेत. ज्या राजकीय प्रक्रियेचा थेट परिणाम या सर्वांवर पडतो, त्या राजकारण विषयापासून दूर झालेलं कसं चालेल?
यातही प्रत्येकाला लोकप्रतिनिधी बनता येईल किंवा प्रत्येकानं तसे झालं पाहिजे ही पण गरज नाही. एक सूज्ञ मतदार लोकसभा ते पंचायत राज स्तरावर अनेक चांगले बदल नक्कीच करू शकतो. जो नागरिक राजकीय विषयाबाबत गंभीर आहे, तोच चांगला मतदार होऊ शकतो आणि खरा भारतीय नागरिक देखील.
आजच्या माध्यमांच्या जगात गावागावात इंटरनेटचे जाळे आहे.या जाळ्याचा आधार घेऊन अनेक जाळी तुमच्यावर टाकली जातात. मग विषय कोणतेही असो.राजकीयदृष्टया विचार केला तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची मते बनवली जातात.
स्वतःची अशी ठाम मते बनवून ती संसदीय पद्धतीने मांडणे व त्यावर संवादाला उत्तरही संसदीय भाषेत सोशल मीडियाद्वारेही मांडणे हे आजच्या युवापिढीसाठी जास्त लाभदायी होईल. राजकारणावर याचे सकारात्मक आणि चांगले परिणाम झालेले दिसतील.
आपण आता राजकारणाकडे एका वेगळ्या नजरेने बघणं गरजेचे आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे यात पूर्ण क्षमतेने सहभागी होण्याची आवश्यकता आहे. तरच जिल्हा, तालुका आणि गांव पातळीवर उत्तम बदल दिसतील. कधी निवडणुकीत उभं राहून, तर कधी मतदानासाठी रांगेत उभं राहून आपल्याला ही जबाबदारी पार पाडावीच लागेल. तयार आहात ना?…घेताय ना चॅलेंज.
एक सात्विक राजकीय युवा चॅलेंजर बनायचं..!
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)