खेडेग्राम ते इंस्टाग्राम..!
युवा चॅलेंजर..! (साप्ताहिक सदर) भाग : ३ रा.
“अरे झिला, माझ्या झिलाक जरा तो काय तो हिडीयो कॉल काय तो करशील काय? लय दिवस झाले, नातवाक बघुक नाय!”
बाबल्या शेजारच्या संत्याला गयावया करत म्हणाला. “ठीक हा आजोबानू, पण लय येळ काढू नको आणि रडत रव्हा नको, तुमचा बोलण्यापेक्षा रडणाच लय आसता”,संत्या म्हणाला.
कॉल वर बोलताना बाबल्या, नेहमीप्रमाणे नातवाला बघून रडला. दर दोन वाक्यानंतर तो मोबाईल फोनचे मुके घेत होता. शेवटी जड अंतःकरण करून त्याने, संत्याचा फोन जड हातांनीच त्याला परत केला आणि तो घरी येण्यासाठी निघाला.
असे अनेक बाबल्या तुम्हाला कोकणात गावागावात दिसतील भेटतील. बाबल्याचा मुलगा जेव्हा शहरात गेला होता, तेव्हा तारेची वाट पाहणारा बाबल्या आणि आता नातवाशी व्हिडिओ कॉल वर बोलणारा बाबल्या यांच्या भावनेत जराही बदल झालेला नाही. तेव्हा अश्रू पत्रावर पडायचे आता मोबाईलवर.मनी ऑर्डरचं गूगल पे झालंय पण वाट बघण्याची आतुरता तीच. मोबाईल तंत्रामुळे नुकसान किती होतं आहे माहिती नाही, पण अशी एकटी पडलेली माणसं काही क्षण का होईना सुखात असतात.
आता उंच डोंगरावर गेल्यावर बदलणारा कोकण जाणवतो. दर 5 किलोमीटरमागे मोबाईल टॉवर उभे राहत आहेत. उंच गडग्यावर चढून रेंज शोधणारी, तोडकं मोडकं का होईना समोरच्या व्यक्तीला ऐकायला आणि सांगायला मिळेल या आशेवर असलेली माणसं रील्स बनून इन्फ्लुएन्सर बनली आहेत. रेंजमुळे होतं असलेला चेंज हाच ग्रामीण कोकणाचा महत्वाचा टप्पा ठरत आहे.
गेल्या ७ ते ८ वर्षात कोकणाने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतीक प्रगती किती केली? याचा नेमका डाटा नसला तरी अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून कोकणात मोठ्या प्रमाणात डाटा वापरात येऊ लागला आहे. नोकिया फोनवरील क्लासीक स्नेक ते आताचा एचडी पब -जी हे ग्रामीण भागातील मोबाईल फोनमध्ये झालेलं हे एक स्थित्यंतर आहे.
पण विषय तर याच्या पुढे आहे. स्वातंत्र्यानंतरही ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दरी दिवसेंदिवस वाढलीच आहे. जसं इंटरनेट सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक आहे.तसंच ते नेट रिचार्ज करताना सर्वांकडून समान सेवेच्या बदल्यात समान पैसे घेते. तिथे ग्रामीण कोटा वगैरे नसतोच. गावातील इंटरनेट वापरकर्त्यांनी याचा विचार करणं अति आवश्यक आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीत इंटरनेट सेवेचा मोठा वाटा यापुढे असणार आहे. बँकिंग, मार्केटिंग, सेल, स्टॉक मार्केट या क्षेत्रात गेल्या 5 वर्षात मोठी क्रांती झालीय. शहरात याचा परिणाम लवकर दिसू लागला.सुदैवाने गावागावात वीज जेवढी उशिरा आणि संथ गतीने पोहचली त्या तुलनेत इंटरनेट सेवा आणि मोबाईल वापर यांच्यात झपाट्याने वाढ झाली. ग्रामीण भारताने या इंटरनेट संधीचा लाभ घ्यायला हवा.
तर माझ्या युवा मित्रांनो, नेट सॅव्ही असलेल्या आपला सोशल मीडियावरील आपला वावर हा वाढतच जातोय. फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यांचा गावात राहून देखील आपण पुरेपूर वापर करत आहोत. नेट वापराची ही दरी शहर आणि गावात नसली तरी आर्थिक आणि सामाजिक दरी दूर अजून झालेली नाही.तंत्रज्ञान ही दरी दूर करण्याची संधी घेऊन आलंय. अगदी गावात राहून प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साथीने चमकण्याची. खऱ्या अर्थाने ‘सोशल इन्फ्लुएन्सर’ बनण्याची संधी आपल्याला चालून आलीय. बाहेरील जग आपल्याला यासाठी चॅलेंज देते आहे.
तर मग घेताय ना हे चॅलेंज?..
आणि बनताय ना युवा चॅलेंजर..!
लेखन : रोशन चिंचवलकर ( पळसंब,सिंधुदुर्ग)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)