राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड तर्फे भव्य शेतकरी सभासद मेळाव्याचे आयोजन....!
अपारंपारिक शेतीतून शेतकरी वर्गाला हक्काची श्रीमंती देण्याचा उद्देश.
मालवण | सुयोग पंडित : राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड तर्फे दिनांक 16 आणि 17 एप्रिलला भव्य शेतकरी सभासद मेळावा व अपारंपारिक शेती मार्गदर्शन असे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणात स्वातंत्र्यानंतरच्या मागील सत्तर वर्षात योग्य नियोजना व पाठबळा अभावी कृषी क्षेत्र विकसित होऊ शकले नाही आणि यामुळेच तेथील तरुणांनी रोजगार व व्यवसायासाठी मुंबई पुण्याची वाट धरल्याने आता ते अधिकच भकास होऊन गेलेले आहे. अशाच पद्धतीने कोकणातील आपल्या राजापूर तालुक्यातील लागवडीयोग्य अशी हजारो एकर जमीन अशीच पडून आहे
याच गंभीर परिस्थितीचा व भविष्याचा विचार करून, मुंबई-पुणे येथील राजापूर तालुक्यातील काही भूमिपुत्र एकत्र आले आहेत. त्यांनी गाठीभेटी करत योग्य विचार-विनिमय करून कोकणातील निसर्गाला पूरक प्रकल्प राबवून या जमिनी लागवडीखाली आणून आपल्या तालुक्याचा आणि त्याद्वारे कोकणाचा विकास करण्यासाठी सदर कंपनीची स्थापना केलेली आहे असे राजापुर तालुका शेतकरी उत्पादक कंपनीने सांगितले आहे.
रेशीम शेती व प्रक्रिया, दुग्ध प्रक्रिया व पशुधन विकास, सेंद्रिय भाज्या लागवड व मार्केटिंग, काजू लागवड व प्रक्रिया, बांबू शेती, सुक्ष्म लघु मध्यम व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, पर्यटन विकास व आयात निर्यात व्यवसाय असे अनेक पर्यावरणपूरक असे उद्योगधंदे कोकणात राबवता येऊ शकतात. “राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड च्या माध्यमातून मुंबई पुणे येथील कोकणी भूमिपुत्रव राजापूर तालुक्यातील कोकणवासीय मिळून साधारण पंचवीस लाख रुपयांचा स्वनिधी भागभांडवलाच्या स्वरूपात उभारण्याचा सदर कंपनीचा मानस आहे.
राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा रेशीम शेतीसाठी चा समूह तयार करून १०० एकर जमीन क्षेत्रांमध्ये तुतीची लागवड करण्यात येईल. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या रेशीम संचालनालयामार्फत विविध प्रकारची अनुदाने मिळवून देण्यात येतील. तसेच मनरेगा योजनेच्या मार्फत देखील लाभ मिळवून देण्यात येईल. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून आपल्याच राजापूर तालुक्याचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील माजी सैनिक श्री वसुदेव घाग यांनी आधी स्वबळावर बांबू शेती व आता आपल्यासोबत ५० शेतकऱ्यांना एकत्र करून रेशीम शेतीची लागवड करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
या पहिल्या टप्प्यानंतर रेशीम प्रक्रिया प्रकल्प पुढील दोन ते तीन वर्षात कार्यान्वित करता येईल. जेणेकरून सदर शेतकऱ्यांच्या मालाला उत्तम भाव मिळू शकेल यामुळे या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ व त्याद्वारे त्यांचा आर्थिक विकास होईल. रेशीम शेतीच्या क्षेत्रातील तज्ञांच्या मते या प्रकल्पाद्वारे राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात एकरी प्रतिवर्ष तीन ते चार लाख रुपयाची वाढ अपेक्षित आहे.
कोकणवासीयांच्या या प्रयत्नांना आपल्या कडून भाग भांडवलाचा रूपाने भक्कम असा आर्थिक पाठिंबा मिळेल आणि या माध्यमातून कोकणात सहकार चळवळीचे बीज रोवून कोकणाच्या एकूणच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगतीच्या नव्या नांदी ची आपण सगळे कोकणवासीय एकत्र मिळून करू असा कंपनीच्या संस्थापक सदस्य तथा प्रबंधकांना विश्वास आहे..
भव्य शेतकरी-सभासद मेळाव्याची रुपरेषा खालील प्रमाणे आहे .
मेळावा दि. १६, १७ एप्रिल २०२२ (शनिवार, रविवार)
रेशीम शेती मार्गदर्शन व चर्चासत्र
प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री रमेश हांदे- रेशीम शेती तज्ञ (ए.एस.सी.कृषी) हे मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच श्री महेश सावंत हे रेशीम शेती शेतकरी आणि बांबु शेती विषयी मार्गदर्शन व चर्चासत्राला संबोधीत करतील.
श्री. वासुदेव घाग – बांबू शेती शेतकरी व तज्ञ यांच्याही प्रमुख मार्गदर्शनाचा लाभ उपस्थित सर्वांना होणार आहे.
राजापूर मध्ये रेशीम प्रक्रिया उद्योग उभारणी व सभासद जोडणी यासाठी श्री. प्रकाश गांवकर, श्री. शशिकांत तोरसकर – निवृत्त एसबीआय अधिकारी श्री. सुतार, सौ. अपेक्षा मासये, सरपंच – पाचल यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या मेळाव्यांसर्भात अधिक माहीतीसाठी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुनाजी गुरव : 9323691616, मंदार नार्वेकर 9619277446,
विश्वनाथ वरेकर 9225235125,
मंगेश मांडवकर 8779331344, अक्षय वाडेकर 8237649310.
दि. १६ एप्रिल २०२२ पहिला मेळावा- सकाळी ९॥ ते १२॥ – श्री साई विमलेश्वर मंगल कार्यालय, शनिवार मु पो ओणी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, पिन कोड 416605 येथे संपन्न होणार असून १७ एप्रिल २०२२ दुसरा मेळावा सकाळी ९॥ ते १२॥ – पाचल ग्राम सचिवालय हॉल रविवार मु. पो. पाचल, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, पिन कोड 416704 येथे आयोजित करण्यात आला आहे .
या मेळाव्याला कोकणच्या जास्तीतजास्त शेतकरीवर्गाने व कृषी उत्सुक लोकांनी उपस्थित रहायचे आवाहन राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड तर्फे तथा आयोजकांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)