डॉक्टर सुधीर शिवेश्वरकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर...!
चिंदर | विवेक परब : आचरा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्काॅन संलग्न) आचरा पंचक्रोशी, या संस्थेचा या वर्षीचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ आचरा येथील शिवेश्वरकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुधीर घन:श्याम शिवेश्वरकर यांना प्रदान करण्याचे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाने जाहीर केले आहे.
आचरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ते शिवेश्वरकर हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली ४० वर्षे केलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल हा पुरस्कार प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शनिवार दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजी आचरे येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशीचे अध्यक्ष बाबाजी गोपाळ भिसळे यांच्या शुभ हस्ते होईल. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्कार साहित्यभूषण चंद्रशेखर चिंतामण हडप – काळसे, धामापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान होणार आहे, अशी माहिती अशोक कांबळी (उपाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे तथा कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक) यांनी दिली.
आचरे पंचक्रोशी जेष्ठ नागरिक सेवा संघाचा वार्षिक मेळावा यशवंत मंगल कार्यालय आचरे भंडारवाडी येथे शनिवार दिनांक २३ एप्रिल २०२२ सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. सदर मेळाव्यात चंद्रशेखर चिंतामण हडप यांचे कथाकथन, बाबाजी गोपाळ भिसळे यांचे ज्येष्ठ नागरिकांशी संवाद आदी मार्गदर्शन, बौद्धिके होणार आहेत. आचरे पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ बंधू-भगिनींनी सदर मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे निमंत्रण सुरेश रामचंद्र गांवकर (सचिव, ज्येष्ठ नागरिक आचरे पंचक्रोशी) यांनी सर्वांना केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)