नारकरवाडीत पोलिसावर वार….!
वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे पोलिसांवरच चाकूहल्ला झाल्याची खळबळजनक घटना काल उशिरा रात्री 09 वाजता घडली आहे. या भीषण हल्ल्यात पोलीस कर्मचारी रमेश नारनवर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या पाठीवर चाकू चे दोन वार झाले आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या संदर्भात पोलिसांनी वैभववाडी तालुक्यातील कोकीसरे येथील संशयित आरोपी राजबुल अंकुश देवकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीवर जिल्हा रुग्णालयात उपचार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयित आरोपी मानसिक रित्या असंतुलीत झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही घटना काल वैभववाडी तालुक्यात कोकिसरे नारकरवाडी येथे घडली.
संशयित आरोपीचे काल त्याच्या आई वडिलांशी वादावादी झाली होती. यातून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याला समजावले परंतु दरम्यान संशयित आरोपी हा दोन्ही हातात चाकू घेऊन फिरत होता. त्यानंतर पोलिस कर्मचारी रमेश नारनवर हे पकडण्यासाठी पुढे गेले व मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने संशयिताला 108 मधून अधिक उपचारासाठी दाखल करण्यासाठी नियंत्रीत करायचा प्रयत्न श्री नारनवर यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत कृष्णात पडवळ, शैलेंद्र कांबळे, हरीश जायभाय हे होते. याच दरम्यान संशयित आरोपीने नारनवर यांच्या पाठीवर सपासप वार केले. यात पोलीस कर्मचारी नारनवर गंभीर जखमी झाले. तर याच संशयित आरोपीने आपल्या वडिलांना देखील मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
संपूर्ण प्रकरणी संशयित आरोपी च्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार व पोलीस कर्मचारी नारनवर यांच्यावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलीस कर्मचारी कृष्णात पडवळ यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपीच्या विरोधात वैभववाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मानसिक संतुलन बिघडलेल्या या व्यक्तीने थेट पोलिसांवरच हल्ला केल्याने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान संशयित आरोपीला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)