युवा चॅलेंजर…! (साप्ताहिक सदर : भाग १ )
लेखन : रोशन चिंचवलकर (पळसंब,सिंधुदुर्ग )
‘ए, आई !अगं दे ना मला, तुझी नऊवारी साडी, नथ, बाजूबंद, बांगड्या आणि हो, ती चंद्रकोर टाईप टिकली. बाकी मेकअप सामान आहे माझ्याकडे. ” प्रिया सकाळपासूनच घाई करत तिच्या आईच्या मागे लागली होती.
आईला समजत नव्हतं असं हिला अचानक काय झालंय? काय गं सकाळपासून हे काय नवं? आईने उत्सुकतेने विचारलं,,”अगं उद्या गुडीपाडवा आहे ना?”
“अगं गुडी नाही गं गुढीपाडवा !” आईने मध्येच थांबवत म्हटलं.
“अगं हो, तेच तेच !अगं माझी कॉलेज फ्रेंड स्नेहा, तिने कालपासूनच ट्रेडिशनल व्हिडीओ टाकायला सुरुवात केली आहे.दोन इन्स्टा रील्स पण बनवलेत. मला पण काही करायला नको का? निदान चांगले सेल्फी तरी काढायचेत मला !” प्रिया उत्तरली… “आणि आठवलं ! दादाची बुलेट आहे ना, त्यावर बसून कॅण्डिड फोटो पण घेईन म्हणते.”
प्रिया आणि तिची आई यांच्यातील हा संवाद हल्ली घरांघरात असतो. आपल्या युवा पिढीचा सण किंवा उत्सव साजरा करण्याचा पॅटर्न बदलत चाललाय. यात गैर काही नाही, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्या, त्या काळाचा, त्या पिढीचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, साधने व माध्यमं वेगळी असू शकतात. पण त्या गोष्टीमागचा विचार, उद्देश हा काहीतरी दाखवण्यापलीकडे आहे आणि युवा पिढीला तो जपता आला पाहिजे.
हिंदू धर्मात म्हणण्यापेक्षा आपल्या देशभरांतच भोगी, मकरसंक्रांत, महाशिवरात्र, होळी पौर्णिमा, धूलिवंदन, रंगपंचमी गुढीपाडवा, अक्षय (अक्षय्य) तृतिया, वटपौर्णिमा, गुरुपौर्णिमा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, मंगळागौर, बैलपोळा, हरतालिका, श्री गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, गौरीपूजन, अनंत चतुर्दशी, नवरात्र उत्सव, दसरा इत्यादी सण आणि उत्सव येतात. मुळात यातील सर्वच सणांचे आणि उत्सवांचे स्वरूप हे चैतन्य आणणारे असते.एकत्र येऊन आयुष्याचा उपभोग घेण्याचा तो एक अलौकिक मार्ग असतो. हे आनंदाचे, एकोप्याचे वातावरण निर्माण करण्याची ही क्षमता या उत्सव आणि सणांमध्ये आहे म्हणून हे सण शिल्लक आहेत.
आगामी काळात या सण आणि उत्सवांमध्ये पारंपरिक वंश आणि अंश किती शिल्लक राहील याबाबत आताच आकडेवारी घेऊन बसत भाष्य करणे म्हणजेच सणांची महती जाणणे नव्हे…किंवा सांस्कृतिक अनास्थेसंबंधी टीका करत बसणे संपूर्ण चूक. त्याची कारणे शोधून पूर्वी असे काय होते की सांस्कृतिक आस्था जपली जात होती व आज त्यासाठी काय आवश्यक आहे त्यावर काम करायचे वैयक्तिक किंवा कौटुंबिक प्रयत्न म्हणजेच युवा पिढीसाठी एक सांस्कृतिक आनंदाचेच काम ठरावे.परंतु, अजून 30 वर्षांनी सध्या सणाला स्वयंपाक करणाऱ्या गृहिणी, पितरांची आठवण ठेवणारा आपला समाज, एकत्र जमणारी उत्साही मंडळी, धार्मिक रीतिरिवाज यात बदल नक्कीच जाणवेल.
उदाहरणार्थ दहीहंडी उत्सवाला एक ग्लॅमर प्राप्त झालंय. कारण, गेल्या दशकभराच्या काळात जगासह आपल्या देशात मोठे बदल झाले. हे बदल राजकीय होते, सामाजिक होते, आर्थिक होते आणि हो सांस्कृतिक देखील होते. ह्या सर्वात महत्वाची भूमिका होती ती इंटरनेटची. आजची पिढी किंवा भविष्यात येऊ घातलेल्या पिढीचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असणार आहे. यात अनेक सांस्कृतिक बाबी देखील आल्या. जेव्हा कधी आपल्या परंपरा, सण, उत्सव यांची सुरुवात झाली होती, तेव्हा त्यांचे स्वरूप, त्यामागचा विचार हा त्यावेळी होता तसाच राहिलाय असं म्हणता येणार नाही. परंतु, काहीतरी दाखवण्याइतकं, अनुभवण्याइतकं, आनंद देणारं या सण उत्सव आणि परंपरा यामध्ये दडलंय म्हणून कसं ही का होईना,ही सर्व संस्कृती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात होईना, टिकून राहणार आहे. तो शाश्वतपणा त्यात आहे. बाकी हे सणांचं, उत्सवांचं जग सर्वकाळ टिकून राहावं ही जबाबदारी आपल्यापासून सुरु होते. सण आणि उत्सव साजरे करण्यात मजा नक्कीच आहे. पण, त्यापेक्षा ते आपण का साजरे करतो यामागची कारणे समजून घेऊन त्यांचा आनंद घेण्यात अजून मजा आहे. हे महत्व तरुण पिढीला समजावून सांगणे गरजेचं आहे. नव्या पिढीची एखादी माहिती मिळवण्याची, काही अंगीकारायची पद्धत कदाचित निराळी असेल पण पालकांनी तसे संस्कार पाल्यावर करणं गरजेचं आहे. तरंच सण आणि उत्सवांच्या सामाजिक उन्नती साधण्याच्या हेतूला पुढील काळातही चार चांद लागत राहतील.आज ईदचा चांदही दिसेल….गुढीही दिमाखात उभारली जाईल…!
युवा पिढीसाठी दोघांनाही सन्मान आस्थेने सांस्कृतिक वारशाने जपणे हे एक चॅलेंज असेल..
तर बनताय ना….एक युवा चॅलेंजर…!
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)