पळसंब शाळेत इंग्रजी साहित्य संच उजळणी कार्यशाळा संपन्न.
पळसंब सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन.
चिंदर | विवेक परब : समस्त भारतात इंग्रजी मातृभाषा असणारे लोक खूप कमी प्रमाणात आहेत. जागतीक स्तरावर दिवसेंदिवस वाढत असलेले इंग्रजीचे महत्त्व पाहता आज इंग्रजी ही ज्ञानभाषा,तंत्रज्ञान भाषा आणि संवाद तथा संभाषण भाषा बनली आहे. इंग्रजी भाषा शिकणे ही काळाची गरज झाली आहे.
भारतीय परिस्थिती लक्षात घेता ९०% पेक्षा जास्त लोकांची इंग्रजी ही मातृभाषा नाही. परंतु इंग्रजी शिकण्यासाठी शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे असे मुळीच नाही तर ती भाषा प्रशालेत विकसीत होऊ शकते याच उद्देशाने शिक्षण विभागाने ही कार्यशाळा आयोजित केली. मातृभाषा मुले शाळेत दाखल होण्यापूर्वी ऐकतो बोलतो, परंतु इंग्रजी भाषा शाळेत गेल्यानंतरच ऐकली आणि शिकली जाते.
सदर कार्यशाळेचे उघाटन पळसंब गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रविकांत सावंत, आचरा प्रभागातील पाचही केंद्रांचे केंद्रप्रमुख श्री. नितीन कदम,श्रीम. सुगंधा गुरव, श्री. प्रसाद चिंदरकर , श्री. देऊ जंगले अशा मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्याध्यापकांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. योगिता पवार यांनी इंग्रजीतून केले. तसेच मुख्याध्यापक शाळा पळसंब श्रीम. मानसी असरोंडकर यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी कार्यशाळेला शुभेच्छा देऊन अश्या प्रकारचा उपक्रम राबवत असल्याबाबत सर्वांचे व शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.
सदर कार्यशाळा आचरा प्रभागातील केंद्र आचरे, चिंदर, श्रावण, रामगड आणि मठ या पाच केंद्रांतील 100% शाळांच्या 100% शिक्षकांसाठी दोन दिवसांची घेतली असून पहिला दिवस केंद्र शाळा आचरे नं 1 येथे 50% शिक्षकांसाठी घेण्यात आली आणि दुसऱ्यादिवशी पळसंब येथे उर्वरित 50% शिक्षकांसाठी घेण्यात आली. दोनही दिवस श्री. भरत काणेकर आणि श्री. विलास बोन्डे यांनी सदर कार्यशाळेत मार्गदर्शन केले. इंग्रजीसाहित्य संचातील साहित्याचा कृतियुक्त उपयोग करून इंग्रजी अध्यापन कसे करावे तसेच विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी इंग्रजी वाचन कोर्स प्रात्यक्षिक घेण्यात आले. श्री. बोन्डे यांनी फोनीक पद्धतीने वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी प्रात्यक्षिक तथा डेमो सादर केला. सर्व शिक्षकांनी कृतियुक्त सहभाग दर्शवून कार्यशाळा यशस्वी करण्यास उत्तम सहकार्य केले. सर्व केंद्रांच्या केंद्रप्रमुखांनी दोन्ही दिवस पूर्ण वेळ उपस्थित राहून मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)