महिलांनी छेडछाडीचे प्रकार बिलकुल खपवून न घेण्याचा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा सल्ला..!
आचरा पोलीस स्टेशनात झालेल्या शांतता समितीच्या बैठकितील मार्गदर्शन
आचरा / वैभव माणगांवकर : आज आपल्या समाजातील महिलांनी शिट्या मारणे, छेडछाड काढण्याचे प्रकार खपवून घेऊ नका यातूनच पुढे एसिड फेकणे, बलात्कार होणे,विनयभंग यांसारखे मोठे गुन्हे होऊ शकतात. यासाठी असे प्रकार तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आचरा पोलीस स्टेशनला झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले.
यावेळी आचरा सरपंच प्रणया टेमकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, मनिष कोल्हटकर, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापार्डेकर, विद्यानंद परब,ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर,आचरेकर, मोहल्ला समितीचे रियान काझी, जाफरूल्ला काझी, जावेद शेख पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण, अक्षय धेंडे, मिनाक्षी देसाई, भगत,मनोज पुजारे यांसह अन्य महिला, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी उपस्थितांना पोस्को कायद्याबाबत माहिती देवून शाळा,काॅलेजमध्ये लहान मुलांशी गैरवर्तन झाले तर मुख्याध्यापक तक्रार करु शकतात मात्र असे प्रकार लपविण्याचे प्रकार घडल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल होवू शकत असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. ‘व्यापाऱ्यांनी बालमजूर कामावर ठेवू नयेत’, अशा विशेष सूचना पोलीस अधिक्षकांनी केल्या.
यावेळी तरूणांनी पोलीस सेवेत दाखल होण्याचे आवाहन करून स्पर्धापरीक्षेस बसू इच्छिणाऱ्या तरुणांबद्दल सहकार्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचे श्रावण गाव भेटी दरम्यान श्रावण ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.
पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या माध्यमातून एक सजग मार्गदर्शन करण्यात आल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)