'एन ए एस' चाचणीत घेतला जिल्ह्यातील ४२९१ विद्यार्थ्यांनी सहभाग!
जिल्ह्यातील १६२ शाळांचा सहभाग
केंद्रीय निरीक्षकांकडून परीक्षा केंद्रांना भेटी
मसुरे | सौ.प्राजक्ता पेडणेकर : केंद्र स्तरावरून संपूर्ण देशात एकाच वेळी इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी पार पडलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी ( NAS) मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६२ शाळांमधील २११ वर्गांतील ४२९१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
केंद्र शासनामार्फत इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावी मध्ये शिकत असलेल्या निवडक विद्यार्थ्यांसाठी दर तीन वर्षांनी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीचे आयोजन केले जाते.
यावर्षीच्या सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६२ शाळा मधून इयत्ता तिसरीचे ७५४ विद्यार्थी, इयत्ता पाचवीचे ८३३विद्यार्थी, इयत्ता आठवीचे १२३८ विद्यार्थी व इयत्ता दहावीचे १४६६ विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले.
या चाचणीच्या कार्यप्रणालीचे निरीक्षक म्हणून खास दिल्लीहून आलेले विजेंदर सिंग यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह वाढविला.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेसाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून निवड झालेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीम. अनुपमा तावशीकर, शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख , जिल्हा समन्वयक नवोदयचे प्राचार्य एम. के. जगदीश व जिल्हा सहाय्यक नोडल अधिकारी डॉ. लवू आचरेकर, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, गटसाधन तज्ज्ञांमधून तालुका समन्वयक यांनी कामकाज पाहिले.
यासाठी डाएट तर्फे २६२ क्षेत्रीय अन्वेषक व सीबीएसई तर्फे १६२ निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यासाठी डाएट अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण विभागमधील समग्र शिक्षा स्टाफ, डी.एड.कॉलेज अध्यापक, उच्च माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, गटसाधन व्यक्ती, मुख्याध्यापक, शिक्षक व सीबीएसई स्टाफ यांनी जबाबदारी पार पाडली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)