आमदार नितेश राणे यांनी घेतली राज्यपाल श्री.कोश्यारी यांची राजभवनात भेट.
कणकवली | उमेश परब : राज्य सरकारने सार्वजनिक गणेश मंडळे व मूर्तिकार यांच्यावर लादलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन केली.यावेळी त्यांच्या सोबत मुंबई सह राज्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि मूर्तिकार उपस्थित होते. शासनाने उंच मूर्ती करण्यावर लादलेले निर्बध, मंडळाना जाहिरात फलक लावण्यास केलेली बंदी,नवनवीन परवानग्या घेण्याची सक्ती, मूर्तिकारांवर लादलेल्या अटीशर्थी यावर आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांसोबत चर्चा केली.सरकारला या जाचक अटी शिथिलकरण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेश मंडळे व मूर्तिकार यांच्या संदर्भात जाहिर केलेल्या नियमावलीत फेरविचार करून बदल व्हावा. सन २०२१ या वर्षाचा गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन टेपलेला आहे . या अनुषंगाने राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ मार्गदर्शक सूचनांचे २९ जून ला एकपरिपत्रक काढले आहे ते जाचक आहे. समाजाच्या जागरुकतेसाठी तसेच लोकांमध्ये एकात्मता , बंधुभाव , देशप्रेमाची जाज्वल्य भावना निर्माण करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती व गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरे करण्याची प्रथा सुरु केली व हि प्रथा आजही कायम आहे . तसेच सर्वधर्मात ही प्रथा दिवसेंदिवस मोठया प्रमाणावर वाढीसही लागलेली आहे . इतकेच नव्हे तर रत्नागिरीत असताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी त्याच गणेशोत्सवाला अखिल हिंदुस्वरुप दिले आहे . हिंदु धर्मात गणेशोत्सव हा सर्वार्थ अग्रगण्य व मोठा सण आहे . राज्य सरकारच्या उपरोक्त परिपत्रकामुळे , कोरीनाच्या महामारीमुळे मागील दिड वर्षापासुन हा उत्सव कशा रितीने साजरा करावा याबाबत मूर्तिकार , सार्वजनिक मंडळे आणि सर्व समाजांमध्ये संभ्रमावस्था व साशंकता निर्माण झालेली आहे . यामुळे शासनाच्या सदरहू परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांमध्ये फेरविचारांती ठोस बदल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी हिंदु समाज , सार्वजनिक मंडळे , मूर्तिकार यांच्याकडून सातत्याने होत आहे . परिणामतः महाराष्ट्रातील संस्कृती व विशेष करुन हिंदु धर्मातील जनमाणसाच्या तीव्र भावनांचा गांभीर्याने विचार करुन फेरबदल केले जावेत अशी मागणी केली आहे.
गणेशोत्सव २०२१ या संबंधित शासनाने जाहिर केलेले परिपत्रक महाराष्ट्रातील बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अमान्य असून याचा पूनर्विचार करावा, सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव मंडळाना २०१९ साली दिलेल्या परवानगीच्या आधारे त्याच परवानग्या याही वर्षी ग्राह्य धराव्यात जेणेकरुन महापालिका व पोलीस प्रशासनाशी जास्त प्रमाणात संपर्क होणार नाही व नवीन परवानग्या घेण्याची आवश्यकतालागणार नाही , शासनाने उंचमूर्तीवर लावलेले निर्बध उठवावे . गणेशोत्सव कालावधीत जाहिराती व जाहिरात फलक लावण्या संदर्भात लावलेले निर्वध उठवून मंडळाना गणेशोत्सवकालावधीत जाहिराती व जाहिरात फलकलावण्यास परवानगी द्यावी . सध्याच्या कोरोनाच्या महामारीमध्ये शासनाने मैदान, शासकीय जागा किंवा रस्ते मंडपासाठी आरक्षित करण्यासाठी मंडळाकडुन कुठल्याही प्रकारची अनामत रक्कमघेऊनये., पीओपी वरील बंदी केंद्र सरकारने नेमलेल्या अभ्यासगटाचा निष्कर्ष येईपर्यंत राज्य सरकारने आपला विशेषाधिकार वापरुन उठविण्यात यावी . यामुळे पीओपी संदर्भात मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्यास मदत होईल., शासनाने गणेशोत्सव कालावधीत मंडळांना ध्वनीक्षेपक व विद्युत रोषणाई वर लावलेले निबंध उठवावे.,कोरोनामुळे आलेले संकट पाहता मूर्तिकारांना गणेशमूर्ती घडवण्यासाठी शासनाने नाममात्र मूल्य आकारुन किंवा मोफत जागा उपलब्ध करुनद्याव्यात., मूर्तिकार व त्यांच्या मजुरांवर कोरोनामुळे आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी शासनाने अनुदान जाहीर करावे., शासनाने मूर्तिकारांना परवानगी देण्यासाठी मूर्तिकारांकडून मागितलेले हमीपत्र रद्द करावे .अशा मागण्याचे निवेदन आम.नितेश राणे यांनी राज्यपाल श्री.कोश्यारी यांना दिले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)