चाफेड-गावठण रस्त्याची अवस्था बिकट, रस्त्याची अक्षरशः चाळण
पाण्याचा प्रश्न मिटला पण रस्त्याचे काय ?
शिरगाव/संतोष साळसकर : खड्ड्यात रस्ता की…रस्त्यात खड्डे…जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य…वाहन चालवताना अक्षरशः जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागते…खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे आपण चंद्रावर आहोत की काय?असा संतप्त सवाल सध्या देवगड तालुक्यातील चाफेड-गावठण येथील ग्रामस्थ करत असून वाहनचालकही त्रस्त झाले आहेत.यापूर्वी येथील ग्रामस्थांना कित्येकवर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता,मात्र आता नळपाणीयोजना सुरू झाल्याने तो मिटला.पण रस्त्याच्या बिकट प्रश्नाने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.
शिरगावहून साळशी मार्गे कणकवली जाणारा हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने या मार्गावरून सर्वच वाहनचालकांची ये-जा असते. गेली कित्येक वर्षे चाफेड-गावठण मार्गे भोगलेवाडी या सुमारे १.८००किमी.मार्गावर डांबरीकरण न झाल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्याची मोठयाप्रमाणावर धूप होते.त्यामुळे पावसाळा सुरू झाला की या मार्गावरील एसटी वाहतूक बंद होते.त्यावेळी गावठणमधील ग्रामस्थ एकत्र येऊन स्वखर्चाने श्रमदान करून खड्डे बुजवितात त्यानंतर एसटी वाहतूक सुरू होते.
मात्र गेल्यावर्षीपासून कोरोनाकाळात या मार्गावरील एसटी वाहतूक बंद आल्यामुळे यंदा खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. घाडीवाडी आणि रानेवाडी च्या उतारावर तर भलेमोठे खड्डे पडल्यामुळे दुचाकी,रिक्षाचालकांना वाहन चालवताना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत आहे.तर काही दुचाकी वाहनांचे घसरून पडण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे सध्या हा संपूर्ण मार्ग वाहतुकीदृष्ट्या फारच धोकादायक ठरला आहे.
केवळ एक महिन्यावर गणेशचतुर्थी सण येऊन ठेपला आहे.या सणाच्या काळात ग्रामस्थांना खरेदीसाठी बाजारात जावे लागते.त्यात सध्या एसटी वाहतूक बंद असल्यामुळे खाजगी वाहनाने बाजाररहाट करण्यासाठी बाजारात जावे लागते.अश्यावेळी दुचाकीवरून बाजाराच्या पिशव्या आणताना खूप त्रासदायक आणि धोकादायक ठरणार आहे.
याबाबत ग्रामपंचायतीने तसेच ग्रामस्थांनी अनेक वेळा पाठपुरावा केला.स्थानिक सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींनाही लेखी निवेदने दिली.मात्र कोरोनाचे कारण सांगून या मार्गावरील डांबरीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.गणेशोत्सवकाळात जरी एसटी वाहतूक सुरू झाली तरी रस्ता नादुरुस्त असल्यामुळे एसटी वाहतूक बंद करण्यात येईल. परिणामी ग्रामस्थांचे खूपच हाल होणार आहेत.
याकडे संबंधित विभाग,शासन,प्रशासन,स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?की आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांच्यावेळी फक्त आश्वासन देतील? यापूर्वी अनेक निवडणूक होऊन गेल्या मात्र या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी केवळ आश्वासनाच्या पलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही अद्याप झालेली नाही,त्यामुळे दरवर्षी या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडून सध्या या रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे.कुणी याकडे लक्ष देईल का?या चाफेड-गावठणला कुणी वाली आहे का? असा येथील ग्रामस्थ चिंतातुर होऊन सवाल करीत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)