सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली होणार : पालकमंत्री नितेश राणे
१६ नोव्हेंबरपासून 'फ्लाय ९१' कंपनीची 'नियमीत उड्डाण सेवा' सुरू.!
कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकास आणि आर्थिक समृद्धीला प्रेरक ठरू शकेल अशा एका पावलाची घोषणा केली आहे. १६ नोव्हेंबर २०२६ पासून सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी 'फ्लाय ९१' कंपनीची विमानसेवा सुरू होत असून, ही उड्डाण सेवा आठवड्याचे 'सातही दिवस' सुरू राहणार आहे. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गवासीयांना संबोधित करताना पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले की, १९९९ मध्ये तत्कालीन मंत्री नारायण राणे साहेब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला. शेती आणि मासेमारीबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे, आर्थिक समृद्धी यावी, हा त्यामागील उद्देश होता. या पर्यटन धोरणाला बळ देण्यासाठी जिल्ह्याला स्वतःचे विमानतळ असावे, यासाठी नारायण राणे यांनी पुढाकार घेतला. एमआयडीसीच्या माध्यमातून चिपी-वेंगुर्ला येथे विमानतळाची उभारणी आणि भूमिपूजनाची प्रक्रिया सुरू झाली. विमानतळ तयार झाल्यानंतर मुंबईसह विविध ठिकाणांहून विमानसेवाही सुरू झाली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे कालांतराने ही सेवा बंद पडली.
त्यानंतरच्या काळातील तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांनीही विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू राहावे यासाठी प्रयत्न केले. दोन वर्षांपूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विमानतळाच्या विकासाला गती देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असे पालकमंत्र्यांकडून स्पष्ट केले गेले.
जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विमानतळासमोरील रस्ते, वीजपुरवठा, नाईट लँडिंग यांसारख्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा केला. विमानतळ आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावे आणि विमानसेवा कायमस्वरूपी सुरू राहावी, यासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग (व्हीजीएफ) मिळविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे सिंधुदुर्ग विमानतळासाठी व्हीजीएफ उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे आता मोठ्या विमान कंपन्यांनाही या विमानतळावर सेवा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे असे पालकमंत्र्यांकडून नमूद करण्यात आले.
याच प्रयत्नांचे पहिले पाऊल म्हणून १६ नोव्हेंबरपासून फ्लाय ९१ कंपनीची सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्याचे सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. मुंबईशी थेट हवाई संपर्क निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. पर्यटन क्षेत्रातील विविध व्यवसायांना चालना मिळेल आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे पालकमंत्री राणे यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने विविध महत्त्वाचे प्रकल्प आणण्यात आले असून, वेंगुर्ला परिसरातील तसेच देवगड येथे प्रस्तावित प्रकल्पांमुळे पर्यटन क्षेत्राला अधिक चालना मिळणार आहे. राज्यासह देशभरातील पर्यटक सिंधुदुर्गात येण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, पर्यटकांना जिल्ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी विमानतळ हे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू होणे ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे असे पालकमंत्र्यांकडून विशेष सांगण्यात आले.
या प्रक्रियेत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे प्रमुख दीपक कपूर, संजय शेट्टी, कटक धोंड यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत विशेष बाब म्हणून सिंधुदुर्ग विमानतळासाठी निर्णय घेण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे पालकमंत्री या नात्याने ना. नितेश राणे यांनी आभार मानले.
विमानतळ सुरू होणे म्हणजे केवळ विमानसेवा सुरू होणे नव्हे, तर पर्यटनाच्या माध्यमातून टूर गाईडपासून हॉटेल व्यावसायिकांपर्यंत अनेकांना आर्थिक सक्षम होण्याची संधी उपलब्ध होणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांनी पर्यटन व्यवसायाच्या संधी ओळखून रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी पुढे यावे, असे आवाहनही पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.
१६ नोव्हेंबरला केवळ 'विमानाचे टेकऑफ होणार नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला आणि पर्यटनाला खऱ्या अर्थाने नवी भरारी मिळणार आहे' असं सांगत सर्वांनी मिळून रोजगाराच्या नव्या संधींसाठी आणि विकसित सिंधुदुर्ग घडविण्यासाठी एकत्र यायचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
खासदार नारायण राणे यांच्याकडून हुंबरट येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी.
खासदार नारायण राणे यांच्याकडून हुंबरट येथे व...
'दुकानदारांनो सावधान...!'
'दुकानदारांनो सावधान...!'ज्येष्ठ पर्यटन व्यावस...
आमदार निलेश राणे यांना मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांचे वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत निवेदन.