‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत
क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांची होणारी फरपट तातडीने थांबवली नाही तर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी एका प्रसिद्धी संदेशाद्वारे, शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ मधील शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचा आरोप केला आहे. स्पर्धा सुरळीत, नियोजनबद्ध आणि खेळाडू - केंद्रित पद्धतीने घेण्याऐवजी केवळ स्पर्धा ‘उरकण्याला’ प्राधान्य दिले जात असल्याने खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि शाळांची मोठी फरपट होत असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.
यंदाच्या क्रीडा स्पर्धांच्या सुरुवातीपासूनच नवीन पोर्टल, जुन्या पोर्टलवरील नोंदणी, खेळाडू नोंदणी आणि तांत्रिक अडचणी यामुळे मोठा कालावधी वाया गेला. या पार्श्वभूमीवर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, तज्ज्ञ क्रीडा शिक्षक तसेच एकविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नवीन नियोजन सभा घेण्यात यावी, अशी मागणी महासंघाने केली होती. मात्र, ही मागणी गांभीर्याने न घेतल्याने आता स्पर्धांच्या नियोजनात गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तालुकास्तरीय स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धांचे नियोजन आधीच निश्चित असणे अपेक्षित असताना वारंवार तारखा व वेळापत्रकात बदल होत असल्याने खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांसमोर नवीच अडचण निर्माण होत आहे.
खेळाडू स्पर्धेसाठी अनेक दिवस सराव करतात. क्रीडा शिक्षकांकडून शाळेच्या वेळेबरोबरच अतिरिक्त सराव, प्रवास, निवास व भोजनाचे नियोजन केले जाते. अशा परिस्थितीत ऐनवेळी स्पर्धेच्या तारखा बदलल्यास या सर्व नियोजनाचा बोजवारा उडतो. खेळाडूंच्या सरावावर आणि त्यांच्या मानसिक तयारीवरही त्याचा परिणाम होतो, असे महासंघाचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या तारखा किंवा कार्यक्रमामुळे विभागीय स्पर्धांचे वेळापत्रक बदलले जात असल्याची बाब महासंघाने उपस्थित केली आहे. राष्ट्रीय स्पर्धा महत्त्वाच्या असल्या तरी त्यासाठी स्थानिक पातळीवरील संपूर्ण नियोजन वारंवार बदलणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. कोल्हापूर विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये स्पर्धांचे नियोजन करताना परस्पर समन्वय अधिक प्रभावी असणे आवश्यक आहे, अशी मागणी महासंघाने केली आहे.
क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी या संपूर्ण प्रकारावर खवळले असून त्यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांचा केंद्रबिंदू हा खेळाडू असला पाहिजे. स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत उरकणे हा उद्देश असू शकत नाही. खेळाडूंच्या सरावाचा, क्रीडा शिक्षकांच्या मेहनतीचा आणि शाळांच्या नियोजनाचा विचार करून वेळापत्रक निश्चित केले पाहिजे. वारंवार होणारे बदल थांबवून सर्व संबंधितांशी चर्चा करून पुढील नियोजन करावे असे अजय शिंदे यांनी नमूद केले आहे तसेच महासंघाने विभागीय उपसंचालकांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कोल्हापूर विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये समन्वय साधावा, अशी मागणी केली आहे.
महासंघाच्या म्हणण्यानुसार, नवीन आणि जुन्या पोर्टलच्या घोळामुळे गेला कालावधी, बदललेले स्पर्धा वेळापत्रक आणि निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन क्रीडा महासंघ, तज्ज्ञ क्रीडा शिक्षक आणि संबंधित एकविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणे गरजेचे होते. मात्र अशी बैठक न झाल्याने प्रत्यक्ष मैदानावर त्याचे परिणाम दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
खेळाडूंच्या हिताचा विचार करून तालुका, जिल्हा आणि विभागीय स्पर्धांचे वेळापत्रक शक्यतो स्थिर ठेवावे, ऐनवेळी होणारे बदल टाळावेत आणि कोणताही बदल अपरिहार्य असल्यास त्याची पूर्वसूचना संबंधित शाळा व क्रीडा शिक्षकांना द्यावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.
खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांची होणारी फरपट तातडीने थांबवली नाही, तर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)