आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद.
आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद.
जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांची भेट तर कोकणी रानभाजी अभ्यासक व औषधी वनस्पती तज्ज्ञ रामचंद्र शृंगारे यांचे मार्गदर्शन.
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : वेंगुर्ला तालुक्यातील आरवली जीवन शिक्षण शाळा क्र. १ येथे रानभाज्या महोत्सव, प्रदर्शन व विक्री, मार्गदर्शन वर्ग तसेच रानभाज्या पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या उपक्रमाची तप्रशंसा केली.
कोकणी रानभाजी अभ्यासक व औषधी वनस्पती तज्ज्ञ रामचंद्र शृंगारे यांनी रानभाज्या व औषधी वनस्पतींचे महत्त्व, त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म आणि दैनंदिन जीवनातील उपयोग याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पारंपारिक व पौष्टिक पाककृतींचे सादरीकरण पाककृती स्पर्धेत करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ममता मेस्त्री यांनी पटकाविला. तर द्वितीय क्रमांक साक्षी शिरोडकर व तृतीय क्रमांक संजना शेलटे यांनी प्राप्त केला. तसेच उत्तेजनार्थ क्रमांक कु. सुप्रिया नाईक व कु. श्रेया कावळे यांना मिळाला.
रानभाज्यांचे संवर्धन, पारंपारिक खाद्यसंस्कृतीचे जतन आणि आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आरवली केंद्राचे केंद्रप्रमुख मारुती गुडुळकर, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरवली जीवन शिक्षण शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शालेय व्यवस्थापन समितीने परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात, इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावलेल्या आरवली येथील हर्षिता नयनेश गावडे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)