लेखक सुरेश ठाकूर यांचे पुस्तक संवेदनशील 'प्रतिभे'सह 'शब्दांच्या पलिकडे'...!
लेखक सुरेश ठाकूर यांचे पुस्तक संवेदनशील 'प्रतिभे'सह 'शब्दांच्या पलिकडे'...!
संपादकीय विशेष
संपादकीय | विशेष : कोमसाप मालवण अध्यक्ष तथा मालवण तालुक्यातल्या आचरा येथील लेखक श्री. सुरेश शामराव ठाकूर यांनी लिहिलेले ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक आता ब्रेल लिपीत येत आहे. अंध बांधवांसाठी हा ‘नूतन प्रकाश’ ठरेल. पुण्यातल्या अंध शाळेतील तीन दशकांच्या सेवाव्रती तथा आदर्श शिक्षिका प्रतिभा प्रणव सेनगुप्ता यांना या पुस्तकाचे ब्रेल लिपीत भाषांतर करायची संकल्पना सुचली. त्यांनी लेखक सुरेश ठाकूर यांची नुकतीच अधिकृत परवानगी मिळवली आहे.
हा प्रयत्न म्हणजे, एका पुस्तकाचे भाषांतर आहे सोबतच संवेदनशील सामाजिक जाणिवेचा आविष्कार आहे. पुणे येथील अंधशाळेत २८ वर्षे शिक्षिका म्हणून सेवा केलेल्या प्रतिभा सेनगुप्ता यांना अंध मुलांच्या जगाची आणि त्यांच्या गरजांची सटीक जाण आहे. सध्या त्या मंडणगड येथे कोकणातील एकमेव अंध विद्यालय चालवत आहेत. सुरेश ठाकूर यांच्या 'शब्दांच्या पलिकडे' पुस्तकातील १११ शब्दांचे कुळ आणि मूळ अंध मुलांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. एका पानावर देवनागरी आणि दुसऱ्या पानावर ब्रेल लिपी अशी या पुस्तकाची रचना असेल अशी माहिती मिळत आहे.
दृष्टी असणाऱ्या आणि नसणाऱ्या अशा दोन्ही घटकांना एकाच पुस्तकातुन अनुभव घेता येईल अशीच ही संकल्पना...! कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्या या संकल्पाला शुभाशीर्वादासह सदिच्छा लाभत असल्याचेही समजते आहे.
या पुस्तकाला माजी शिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे यांची 'सृजनत्वाच्या जाणीव जपणुकीसह असलेली जबाबदार प्रस्तावना' या पुस्तकाला लाभली आहे. हे पुस्तक 'कोमसाप'च्या युट्युब चॅनलवर सौ. रश्मी आंगणे यांच्या माध्यमातून वाचले जात आहे.
अनेक अर्थाने 'शब्दांच्या पलीकडले' जात आहे. लेखक सुरेश ठाकूर यांचे हे पुस्तक ब्रेल लिपीत आणून प्रतिभा सेनगुप्ता यांनी अंध बांधवांसाठी मराठी शब्दांच्या ज्ञानसूर्यातल्या तथा 'मराठी शब्द मित्रातल्या' अत्यावश्यक 'ड' जीवनसत्वासाठीची एक खिडकी खुली केली आहे.
या शब्द संवेदनशील आणि सेवाभावी कार्यासाठी लेखक सुरेश ठाकूर आणि अनुवादोत्सुक प्रतिभा सेनगुप्ता यांचे विविध क्षेत्रातील व स्तरातील जाणकारांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)