'साहेब, रस्त्याची ही अशी दुर्दशा..., दळणवळण 'चलतला' कसा...?'
'साहेब, रस्त्याची ही अशी दुर्दशा..., दळणवळण 'चलतला' कसा...?'
आरोग्य, शिक्षण, शेती आणि दळवळणाच्या गैरसोयींबद्दल मसुरे - डांगमोडे रस्त्यासाठी ग्रामस्थांचा आंदोलनात्मक पवित्रा, अधिकारी वर्गावर प्रश्नांची सरबत्ती आणि निवेदन.
अधिकारी वर्गाच्या आश्वासनानंतर आंदोलन 'तूर्तास' स्थगित.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील मसुरे येथे, गुरुवारी, १६ जुलै २०२६ रोजी ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनात्मक पवित्रा घेतला. बांधकाम विभागाचे अधिकारी यांना रस्त्याच्या ठिकाणी बोलावून घेऊन त्या रस्त्याच्या दुर्दशे बाबत आणि रस्ता तात्पुरता तरी सुस्थितीत आणण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला विचारणा करून आंदोलनाची आणि उपोषणाच्या निवेदनाची प्रत उपस्थित झालेल्या अधिकारी वर्गाकडे सुपूर्द केली. यावेळी बांधकाम विभागाचे कुडाळ येथील अधिकारी उप अभियंता प्रदीप भोसले आणि ज्युनिअर इंजिनियर साई चव्हाण यांनी या रस्त्याचे पाहणी करून येत्या चार दिवसात हा रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी आपले आंदोलन तूर्तास स्थगित केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे - डांगमोडे ते मालडी असा सुमारे ४ ते ५ किलोमीटर रस्त्याचे काम गेले तीन वर्ष सुरू असून ते काम प्रगतीपथावर नसल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झालेला आहे तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने संपूर्णपणे या रस्त्यावरील चिखलाचे साम्राज्य तयार असल्याने या रस्त्यावरून चालणेही ग्रामस्थांना कठीण बनले आहे. दळणवळणाचे मुख्य साधन असलेली एसटी सुद्धा गेली तीन वर्षे पूर्णतः बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी सर्व संबंधितांचे लक्ष वेधले होते.
गुरुवारी, १६ जुलै २०२६ रोजी ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनात्मक पवित्रा घेतला. बांधकाम विभागाचे अधिकारी यांना या रस्त्याच्या ठिकाणी बोलावून घेऊन या रस्त्याच्या दुर्दशा बाबत आणि रस्ता तात्पुरता तरी सुस्थितीत आणण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला विचारणा करून आंदोलनाची आणि उपोषणाच्या निवेदनाची प्रत उपस्थित झालेल्या अधिकारी वर्गाकडे सुपूर्द केली. यावेळी बांधकाम विभागाचे कुडाळ येथील अधिकारी उप अभियंता प्रदीप भोसले आणि ज्युनिअर इंजिनियर साई चव्हाण यांनी या रस्त्याचे पाहणी करून येत्या चार दिवसात हा रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले.
संबूधित रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून आल्याने संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे दुचाकी व इतर वाहने घसरून अनेक छोटे - मोठे अपघात घडतात. ग्रामस्थांच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याचे योग्य ते काम न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात माती वाहून येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे राज्य परिवहन मंडळाने (ST) या मार्गावरील आपली बस वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. बस सेवा बंद झाल्यामुळे गावातून मालवण किंवा इतर ठिकाणी महाविद्यालयात आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना पायपीट करावी लागत आहे किंवा खाजगी वाहनांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रात्री - अपरात्री गावात कोणी आजारी पडल्यास किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका किंवा इतर वाहन मिळणे कठीण झाले आहे. कोणताही डॉक्टर या रस्त्याच्या खराबी मुळे रुग्णाची तपासणी करण्यासाठी गावात येताना हजार वेळा विचार करत आहे. आरोग्य सेवा वेळेत न मिळाल्यास अनुचित प्रकार घडण्याची भीती निर्माण झाली आहे.
याबाबत संबंधित विभागाला ग्रामस्थांनी आंदोलन आणि उपोषणाबाबत निवेदनाची प्रत दिली. या निवेदनाची गंभीर दखल घेऊन येत्या पाच दिवसांत प्रशासनाने किंवा संबंधित ठेकेदाराने रस्त्याबाबत ठोस उपाययोजना किंवा काम सुरू न केल्यास, आम्ही समस्त ग्रामस्थ बांधकाम विभाग मालवण कार्यालयासमोर तीव्र उपोषण व आंदोलन छेडणार असून यादरम्यान काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयाची व प्रशासनाची राहील. हा रस्ता या भागातील दळणवळणाचा मुख्य कणा असल्याने तो सुस्थितीत आणणे अत्यंत आवश्यक आहे. तरी आपल्या स्तरावरून संबंधित ठेकेदाराला तात्काळ आदेश देऊन रस्त्याच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश द्यावेत असे निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे. या रस्त्याच्या कामासंदर्भात काही रक्कम संबंधित ठेकेदाराला संबंधित विभागाने दिली असून यापुढे एकही रुपया संबंधित रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारास देऊ नये असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.
यावेळी उपस्थित अधिकारी आणि ग्रामस्थांनी मसुरे डांगमोडे मालडी या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. ग्रामस्थांच्या वतीने रस्ता डागडुजीसाठी सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांनी संबंधित अधिकारी वर्गास दिले आहे. श्री. ठाकूर यांनी या रस्त्या संदर्भातील मुद्दा मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत लावून धरला होता व याबद्दल आंदोलनाचा इशाराही दिला होता. माजी उपसरपंच पिंट्या गावकर यांनी या रस्ता प्रश्नासंदर्भात प्रश्न उपस्थित करून संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते.
हा रस्ता येत्या चार दिवसात सुस्थितीत आणण्यासाठी संबंधित विभागाच्या वतीने योग्य ते सहकार्य आणि उपयोजना केली जाईल आणि उपलब्ध साधनसामग्रीनुसार रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित असणारे उपअभियंता कुडाळ प्रदीप भोसले आणि ज्युनिअर इंजिनियर साई चव्हाण यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.
यावेळी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, माजी उपसरपंच मसुरे पिंट्या गावकर, नवतरुण मित्र मंडळ डांगमोडेचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ठाकूर, परशुराम ठाकूर, महेश ठाकूर, राजेंद्र ठाकूर, बुधाजी ठाकूर, अशोक चव्हाण, किशोर ठाकूर, जुबेर सय्यद, खलील सय्यद, फारुख काझी, आसिफ शेख, प्रशांत चव्हाण, हरी ठाकूर, स्वप्निल ठाकूर, गुरुनाथ ठाकूर, मंगेश ठाकूर, सोमा ठाकूर, आदी सहित डांगमोडे, मालडी, मसुरे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या आंदोलनात्मक पवित्र्या दरम्यान उपस्थितांकडून अधिकारी वर्गाला, रस्त्याची अशी दुर्दशा.., दळणवळण 'चलतला' कसा,' अशा आशयाचे सवाल उपस्थित करण्यात आले अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)