रोटरी क्लब कणकवली अध्यक्षपदी रो. सुप्रिया समीर नलावडे.
रोटरी क्लब कणकवली अध्यक्षपदी रो. सुप्रिया समीर नलावडे.
उपाध्यक्षपदी रो. तृप्ती कांबळे तर सचिवपदी डॉ. अमेय मराठे आणि खजिनदारपदी रो. डॉ. प्राजक्ता तेली यांची निवड.
कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या २०२६ - २७ या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता अलंकार मंगल कार्यालय, कणकवली येथे संपन्न होणार आहे.
या पदग्रहण सोहळ्याला इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून रो. स्वाती हेरकल उपस्थित राहणार असून या रोटरीच्या ज्येष्ठ नेत्या, यशस्वी उद्योजिका आणि वाईच्या पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत.
नवीन कार्यकारिणीमध्ये रोटेरियन सुप्रिया समीर नलावडे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच रोटेरियन डॉ. अमेय मराठे यांची सचिवपदी, रोटेरियन तृप्ती कांबळे यांची उपाध्यक्षपदी तसेच रोटेरियन डॉ. प्राजक्ता तेली यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीने समाजहिताला प्राधान्य देत वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन केले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक मार्गदर्शन व प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचा मानस आहे. तसेच कणकवली तालुक्यातील अंगणवाडीतील कुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी विशेष पोषण अभियान राबविण्यात येणार असून त्यांच्या आरोग्य आणि पोषणाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
युवकांमध्ये वाढत्या अमली पदार्थ, सिगारेट व इतर व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष व्यसनमुक्ती अभियान आयोजित करण्यात येणार आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने मोफत फायरलेस कुकिंग प्रशिक्षण तसेच पौष्टिक आहारावर आधारित विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दिव्यांग बांधवांसाठी पांढऱ्या काठ्या, जयपूर फूट तसेच आवश्यक सहाय्यभूत साहित्य उपलब्ध करून देण्याचाही मानस आहे. किशोरवयीन मुलींसाठी 'कळी उमलताना' या उपक्रमांतर्गत मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य आणि मानसिक सक्षमीकरण याविषयी जनजागृती केली जाणार आहे.
तसेच नियमित रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, अवयवदान व नेत्रदान जनजागृती, जलसंवर्धन अभियान, स्वच्छता उपक्रम, करिअर मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, वाचन संस्कृती संवर्धन तसेच ज्येष्ठ नागरिक सन्मान व आरोग्यविषयक उपक्रमही वर्षभर राबविण्यात येणार आहेत.
'स्वतःपेक्षा सेवेला प्राधान्य' या रोटरीच्या ब्रीदवाक्याला अनुसरून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची भावना पोहोचविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल विविध नाविन्यपूर्ण व लोकहितकारी उपक्रम राबविणार असल्याची माहिती नूतन कार्यकारिणीने दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)