ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
'अमिदी..!'
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'अमिदी..!'

'अमिदी...!'

Article image


शालेय शैक्षणिक वर्षारंभाचे १९९० च्या दशकातले मालवणातील एक 'स्टेशनरी स्टेटमेंट...!'


संपादकीय विशेष : सध्या, यंदाच्या २०२६ -२०२७ या शालेय शैक्षणिक वर्षासाठी विविध शाळांमधल्या 'प्रवेशोत्सवाचं' वातावरण आहे. यासंबंधी विविध वार्तांकनं करताना मन नकळत बालपणात गेलं. मालवण फोवकांडा पिंपळ ते धुरीवाड्याच्या मुख्य रस्त्यावर, टोपीवाला हायस्कूलला लागून, नाईकांचं 'अमिदी' हे स्टेशनरीचं दुकान होतं. श्री. व सौ. नाईक हे दांपत्य अत्यंत कष्ट व निगुतीने ते दुकान चालवत असत. ते, भल्या सकाळी महाविद्यालयं सुरू होण्यापूर्वी तासभर म्हणजे साधारण साडेसहा - पावणेसात वाजता देखिल दुकान उघडत असत. विशेषतः शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांनंतर त्यांच्याकडे भरपूर माल येत असे. अधनं मधनं तसे त्यांच्याकडे मालाचे मोठ्ठाले खोकेच्या खोके येत असत पण ग्राहकांना 'अमिदी' कधीच अस्ताव्यस्त दिसलं नव्हतं. 'अमिदी' दुकानाच्या फळ्या उघडल्यावर नीटनेटकेपणा आणि नाईक दांपत्याची शिक्षणाला अनुकूल व पूरक अशी आश्वासक प्रसन्नता दिसायची. दोघांनाही, चित्रकलेच्या शिक्षकांसारखीच एका कागदावर सुवाच्य अक्षरं लिहून पेन, पेन्सिलची चाचणी करायची सवय होती. पेन्सिलला अलगदपणे टोक काढायची त्यांची अशी पद्धत होती.


नाईकांना तीन मुलं आणि त्यांची नांव 'अमित, मिलिंद, दीपक किंवा दिलीप असं होतं हे पुसटसं आठवतंय, त्यामुळे त्यांच्या दुकानाचं नांव 'अमिदी' होतं असं 'वरच्या' वर्गातले जाणकार सांगायचे..! 'अमिदी' हे दुकान एकाप्रकारे प्रशालेचाच अलिखित हिस्सा होतं. ते शाळेच्या लगत होतं आणि अ. शि. दे. टोपीवाला प्रशालेचे तत्कालीन मुख्याध्यापक दिवंगत प्रकाश प्रभू सरांच्या तत्कालीन घराकडे जाणारी पायवाट सुद्धा 'अमिदी' आणि शाळेच्या मध्येच असल्यानं 'अमिदी'चा एकंदर माहौल हा गंभीर, तणावपूर्ण शांततेचा आणि संपूर्ण शैक्षणिक असायचा. तत्कालीन अनेक ज्येष्ठ शिक्षक, तत्कालिन निवृत्त शिक्षक, तत्कालीन महाविद्यालयीन प्राध्यापक आणि तत्कालीन कडक शिक्षकांची घरं सुद्धा 'अमिदी'च्या आसपास होती त्यामुळे तिथल्या वातावरणात कितीही गर्दी असली तरी कोणी गडबड, हुल्लडबाजी करत नसे. शिक्षक वर्गापैकी कोणीतरी त्यावेळी 'पेट्रोलिंग वर असेल तर....' असा 'अमिदी' परिसरात 'शिक्षकी' खाक्या जाणवत असायचा.


१९८० आणि १९९० च्या दशकात, मालवणात 'स्टेशनरी वस्तूंनी नटलेलं शालेय शिक्षण' फुल्ल फाॅर्माॅत होतं. उन्हाळी सुट्यांनंतर शाळा सुरू होताना थोडं गूढ ढगाळ वातावरण, नवीन इयत्तेतल्या नवीन शिक्षकांच्या शिकवण्याविषयीची अंदाज बांधणीच्या दबक्या आवाजातल्या चर्चा यासाठी 'अमिदी'च्या आसपास काही शूर मुलांचे घोळके दिसायचे पण ते ही अगदी कधीतरी...! 

शालेय शैक्षणिक विषय आणि त्यांना पूरक चित्रकला, कला इतिहास, शिवणकाम, सुतारकाम अशा विषयांसाठी 'स्टेशनरी दुकान' हे नितांत अत्यावश्यकतेसह आदराचं स्थान होतं. नाईक दांपत्य आणि त्यांच्या तिन्ही मुलांना सर्व पाठ्य पुस्तकं, गाईडस आणि त्यांच्यासोबत विविध शालेय शिक्षकांना अपेक्षित विविध प्रकारच्या वह्या, पेन्सिली, पाट्या, खोड रबरं, गिरमिटं, कंपास पेट्या, छोट्या पट्ट्या, फुट पट्ट्या, सुटा कोनमापक, त्रिकोणी गुण्या, कर्कट, कम्पस अशा वस्तूंची तज्ञता होती. नाईकांच्या तिन्ही मुलांनी मात्र कधी 'नव - नवीन वस्तू' दप्तरात आणून बढ़ेजाव केले नव्हता हे ही उत्तम स्मरणात आहे कारण त्या 'अमिदी' पैकी 'अ' म्हणजे अमित हा आमच्याच वर्गातला.....! स्वतःचं स्टेशनरीचं भरपूर चालणारं दुकान असूनही तो कुठलीही शालेय वस्तू अत्यंत काळजीपूर्वक वापरायचा किंवा 'त्यांचं शालेय स्टेशनरीचं दुकान होतं म्हणूनच तो त्या प्रत्येक वस्तूचं मूल्य जबाबदारपणे जाणत होता....!'


कधीतरी गर्दी नसताना धीर करून श्री. नाईक काकांशी संवाद देखिल व्हायचा. सदैव फाॅर्मल इन शर्ट पॅन्ट मधले नाईककाका त्यांचे 'अमिदी' दुकानाचे तत्व सांभाळत शहरात वावरताना दिसायचे आणि बाहेर कुठेही प्रवासातून वगैरे आलेले असले तरी तीच नीटनेटकी प्रसन्नता ते जपून असायचे.


'अमिदी'च्या स्मरणाने शालेय शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभ झालेल्या प्रत्येक दिवसाला, घटकाला मनःपूर्वक शब्द वंदनासुद्धा देता येतेय हा आनंद आहे. मालवणात, आमच्यासाठी 'अमिदी' ही माध्यमिक स्तरापर्यंतच्या जाणीवेचं स्थानक होतं आणि त्याहीपुढच्या 'उच्च माध्यमिक ते विद्यापीठ स्तरीय' स्थानकांमध्ये 'पाटकरांचं स्टेशनरी दुकान, काळसेकर सरांचं बाजारातलं स्टेशनरी दुकान, दत्त स्टेशनरी, विजया बेकरीच्या बाजुचं मेहबूब चाचाचं एक असं दुकान की जिथे बाकीच्या स्टेशनरीत न मिळणारी एखादी दुर्मिळ शालेय वस्तू हमखास मिळायची, १९९० नंतर भरडवरचं तत्कालीन अपग्रेडेड 'आदर्श स्टेशनरी' दुकान ही व अशी अनेक दुकानं त्यांचं त्यांचं असं गांभिर्य, वैशिष्ट्य आणि मालवणच्या व्यापारी परंपरेतील 'शालेय शिक्षण खुलवणारी पूरक तत्व' जपणारी केंद्रे म्हणता येतील. या सर्व दुकानांतील मालक, त्यांचे कुटुंबीय व सहकारी सेवक यांच्याबद्दल विद्यार्थी वर्गात आस्था होती.....आणि सदैव आहे. 


'अमिदी' दुकान आता तिथे नाही. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत श्री. नाईक कुटुंबीयांपैकी कोणीच कधी भेटलेलं नाही तरिही 'आमिदी' मनाच्या पटलावर जिथे आहे तिथेच आहे...!   


जेंव्हा जेंव्हा उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा उघडतात तेंव्हा 'अमिदी' प्रकर्षाने आठवल्याशिवाय रहात नाही. 'अमिदी' च्या शेल्फवरच्या त्यावेळच्या भयंकर विद्यार्थी प्रिय 'कारवाॅ'च्या ( आम्ही कॅरॅव्हॅन असंही उच्चारायचो) वह्यांवरचा उंटांचा तांडा, करकरीत कागदाचा गंध, जर्नल पेपर्स, फुलस्केपस, वह्या पुस्तकांची कव्हरं, पायलट - रेनाॅल्ड - रोटोमॅकची पेनं, कॅमलीनच्या पेन्सिली, लीडच्या पेन्सिली आणि त्यांच्या नाजुक 'लीडं' ठेवायच्या चपट्या आयताकृती डब्या, रंगपेट्या, लाकडी पट्ट्या, छोट्या दिनदर्शिका, दप्तरं आणि त्यावर 'फ्री' मिळणारी वाॅटरबॅग, सुट्या पैशांचा अभाव असल्यावर लाल कागदी रॅपरमधली 'किस मी' टाॅफी व 'मेलोडी' चाॅकलेटस यांचं 'चलन' आणि खूप काही आठवत जातं, आठवत रहावं असंच वाटत वाटत आठवत रहातं.......!  



सुयोग पंडित ( मुख्य संपादक, आपली सिंधुनगरी न्यूज )


( लेखाला छायाचित्र हे काल्पनिक असून सदर लेखन हे कुठलीही जाहीरात नाही.)


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स