'द्रष्टसिद्ध..!' ; पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी विशेष.
'द्रष्टसिद्ध......!
पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी विशेष.
संपादकीय विशेष : पंडित जवाहरलाल नेहरू एक राजकीय नेते होते आणि सोबतच ते एक प्रगतीशील विचारवंत, उत्कृष्ट लेखक आणि भारत देशाला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून देणारे द्रष्टे राष्ट्रपुरुष होते असे जाणकार आवर्जून सांगतात. २७ मे १९६४ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
१९१९ मध्ये महात्मा गांधींच्या संपर्कात आल्यानंतर नेहरूंनी स्वतःला पूर्णपणे स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी नऊ वेळा, म्हणजेच सुमारे नऊ वर्षे तुरुंगवास सोसला. तत्कालीन तरुण आणि आश्वासक नेते म्हणून त्यांनी देशभरातील तरुणांना आणि बुद्धिवंतांना एकत्र आणले. आधुनिक भारताची पायाभरणीस्वातंत्र्योत्तर काळात विखुरलेल्या भारताला एकत्र बांधून एक मजबूत राष्ट्र बनवण्याचे आव्हान नेहरूंसमोर होते. त्यांच्या दूरदृष्टीने विविध क्षेत्रातल्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीच्या ध्यासांची पर्व सुरू झाली होती. भारताला एक 'राष्ट्र' म्हणून स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी 'पंचवार्षिक योजना' सुरू केल्या आणि मोठ्या उद्योगांची पायाभरणी केली.
आयआयटी, आयआयएम आणि इस्रो अशा संस्थांची स्थापना करून त्यांनी देशात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला होता याचेही स्मरण अनेक राष्ट्रद्रष्टे आजही करतात.
जगातील मोठ्या सत्तांच्या संघर्षात न पडता त्यांनी 'अलिप्ततावादी धोरण' स्वीकारले ह्या त्यांच्या भूमिकेबाबत त्यांचे समर्थन, विरोध अशा दोन्ही भावना त्यांनी समतोलपणाने हाताळल्याचे सांगितले जाते. देशातली सामान्य माणसं ही धैर्य व संयमाने कर्तुत्व सिद्ध करत स्वतःला नेतृत्वासाठी सज्ज करू शकतात असाही त्यांचा असा राजकीय दृष्टीकोन होता.
मागील काही पिढ्यांतल्या बहुतांश बालक वर्गासाठी, 'चाचा नेहरू' हे त्यांच्या आवडत्या गुलाब पुष्पासह जीवन आश्वासक ठरलेले व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्याच बालक वर्गातून आजच्या ज्येष्ठतेकडे गेलेली पिढी दिवंगत पंडित नेहरुंचे विशेष स्मरण करत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)