खासदार नारायणराव राणे यांचा १० एप्रिल रोजी कणकवलीत वाढदिवस सोहळा.
खासदार नारायणराव राणे यांचा १० एप्रिल रोजी कणकवलीत वाढदिवस सोहळा.
कणकवली | ब्यूरो न्यूज : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस १० एप्रिल २०२६ रोजी साजरा होणार आहे. त्यांचे हे अमृत महोत्सवी म्हणजे ७५ व्या वर्षात पदार्पण आहे. यानिमित्त पुढील वाढदिवसापर्यंत अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर भव्य वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मंत्री, आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
या वाढदिवसाला सिने अभिनेते संजय दत्त उपस्थित राहणार असून सोहळ्यानंतर पार्श्वगायक सोनू निगम यांची 'लाईव्ह कॉन्सर्ट' असणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित नाईक, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, कणकवली सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, जि. प. सदस्य मनोज रावराणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, बँक संचालक प्रकाश मोरेये, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कणकवली शहर अध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रभाकर सावंत म्हणाले, खासदार नारायणराव राणे यांचा ७४ वा वाढदिवस यावेळी होत असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त अमृत महोत्सव पदार्पण सोहळा यावर्षी राबवण्यात येत आहे. वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. दर महिन्याच्या १० तारीखच्या दरम्यान हे उपक्रम रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राबविले जाणार आहेत. यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, राणे यांचे हितचिंतक आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकही सहभागी होतील.
खासदार नारायण राणे यांना पुष्पगुच्छ भेट देण्याऐवजी पुस्तक भेट द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही पुस्तकांची भेट सोहळ्याच्या प्रवेशद्वारावरच स्वीकारण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ही पुस्तके विविध ग्रंथालयांना देण्यात येणार आहेत. कोकणातील वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी हा यामागचा उद्देश आहे, असेही प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)