ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या सूरांनी उजळली नेरूरमधली 'स्वर संध्या..!'
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या सूरांनी उजळली नेरूरमधली 'स्वर संध्या..!'

शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या सूरांनी उजळली नेरूरमधली 'स्वर संध्या..!' 

Article image


जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ.


Article image

Article image


श्री. देव कलेश्वर मंदिर प्रांगणात वसंत पूजे निमित्त आयोजित कार्यक्रमाला रसिकांची सात्विक सुस्वर अनुभूतीची प्रतिक्रिया.


                

ब्यूरो न्यूज | कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत 'स्वर संध्या' कार्यक्रम संपन्न झाला. 

पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांचे शिष्य व राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या सुस्वर आवाजाने, 'स्वर संध्या' कार्यक्रम ३ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाला सुरेल ताना, वाद्यांची समर्थ साथ अशा कलेच्या बरसातीत मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद हा स्वर संध्येचा सर्वात 'वरचा' सूर ठरला अशी प्रतिक्रिया विविध 'स्वर जाणकारांनी' व्यक्त केली. 


कुडाळ - नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिराच्या प्रांगणात वसंत पूजेच्या निमित्त हा स्वर संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच शास्त्रीय गायक महेश काळे यांचा संगीत कार्यक्रम होत असल्याने सिंधुदुर्ग सह रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यासह गोवा राज्यातून देखील हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली. 


अमेरिका ते पुणे आणि सिंधुदुर्ग असा अठ्ठावीस तासांचा प्रवास करून आल्यानंतर गुरुवारी माणगाव येथील दत्त मंदिर येथे भेट दिली. तेथील शांत आणि आध्यात्मिक वातावरणाने प्रवासाचा सगळा त्रास दूर झाल्याचे श्री. महेश काळे यांनी आवर्जून सांगितले. प्रत्येकाने राम नामाचा जप करावा. भारतीय संस्कृती ही समृद्ध असून ती जपण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन देखील महेश काळे यांनी कार्यक्रमा दरम्यान केले. अत्यंत नम्र, संयमी आणि बोलण्यातील सभ्यतेमुळे सर्व वयोगटातील रसिकांवर त्यांची विशेष छाप पडली.


मैफिलीचा प्रारंभ शास्त्रीय गायक महेश काळे यांनी 'शिवरंजींनी' रागातील भगवान शिव यांच्या पूजेचे आणि त्यांच्या रूपाचे वर्णन करणाऱ्या 'महादेव' या बंदिशिने केला. त्याला जोडूनच 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील गाजलेले 'सूर निरागस हो' हे 'भूप' रागामधील गीत सादर केले. यानंतर 'दिगंबरा दिगंबरा' जयघोषात 'दत्त नामाचा करुनी गजर, हरुनी घ्या हो माझे चित्त' हे राग 'तोडी' वर आधारित भक्तीगीत सादर केले. ​या गाण्यातील स्वरांची मांडणी आणि महेश काळे यांची गायकी यामुळे हे गीत ऐकताना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती आली. या नंतर महेश काळे यांनी स्वतः लिहून स्वरबद्ध केलेले श्री राम यांच्यावरील गीत सादर केले. 


रात्रीच्या पहिल्या प्रहरात गायला जाणारा राग 'यमन' आणि 'केहरवा' ताला मधील पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी गायलेले 'शब्दावाचून कळले सारे' हे भावगीत स्वतःच्या वेगळ्या शैलीत गाताना रसिकाना मंत्रमुग्ध केले. हे गीत गाताना उपस्थित प्रेक्षकांचा कोरस साठी मोठ्या खुबीने वापर केल्याने सगळेच गायक असल्याचे महेश काळे गाण्या नंतर म्हणाले. 'राग मालकंस' आणि 'केहरवा' तालातील गीतकार कुसुमाग्रज आणि गायक तथा संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ' हे सुरानो चंद्र व्हा...' या गाण्यातील भाव गायिकीतून त्यांनी अधिक गडद केले. 


उत्तरार्धात अभंगाकडे वळताना राग 'अहीर भैरव ' मधील संत तुकाराम महाराजांचा 'आता कोठे धाव मन, तुझे चरण देखियेला' या अभंगातून  विठ्ठलाच्या चरणी मन स्थिर झाल्याचे आणि आता दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नसल्याचा शरणागत भाव व्यक्त केला. यानंतर 'सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी' हा संत नामदेव महाराजांचा अभंग 'यमन' रागात सादर केला.अभंगाची श्रृंखला चालू ठेवत 'जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले..' हा संत नामदेव महाराजांचा अभंग ' मधुवंती' रागात व ' केहरवा ' तालात सादर केला.


कानडा राजाने मैफिलीचा शेवट कार्यक्रमाच्या शेवटी महेश काळे यांनी अत्यंत वेगवान ताना आणि शास्त्रीय प्रभुत्वाने सादर केलेला संत चोखा मेळा यांचा ' कानडा राजा पंढरीचा ' हा अभंग राग 'अडाणा' आणि ताल 'द्रुत तीनताल' मध्ये सादर करत मैफिलीचा शेवट केला.  हा अभंग गाताना महेश काळे यांची स्वरांवरील हुकूमत खरोखरच थक्क करणारी होती. कार्यक्रमाच्या अखेरीस नेत्रदीपक फटाक्यांची जोरदार आताषबाजी करण्यात आली. कार्यक्रम काहीसा लवकर आटोपता घेतला तरी आपल्याला पुन्हा सिंधुदुर्गात यायला आवडेल असं सांगत सर्व रसिक प्रेक्षक आणि मतकरी कुटुंबियांचे महेश काळे यांनी अखेरीस आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स