मालवणातील १६ वर्षांखालील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेत ऑक्स्फर्ड क्रिकेट क्लब व ॲकॅडमी गोवा संघ विजेता तर एम क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी संघाला उपविजेतेपद.
मालवणातील १६ वर्षांखालील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेत ऑक्स्फर्ड क्रिकेट क्लब - ॲकॅडमी गोवा संघ विजेता तर एम क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी संघाला उपविजेतेपद.
स्वर्गीय राजनभाई आंगणे ह्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे 'एम क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी' आयोजित स्पर्धेच्या बक्षिस वितरणाला उद्योजक आनंद आंगणे, उदय नाईक, संदीप घाग, स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, हौशी क्रिकेट असोसिएशन जिल्हा अध्यक्ष अनिल हळदिवे व मान्यवर उपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे, १९ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या दरम्यान, एम. क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे स्मृती चषकाचे दुसरे पर्व संपन्न झाले. १६ वर्षांखालील खेळाडुंसाठीच्या ह्या स्पर्धेत गोव्यातील ऑक्सफर्ड क्रिकेट क्लब ॲकॅडमीच्या संघाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत एम. क्रिकेट ॲकॅडमी, सावंतवाडी संघाने उपविजेतेपद मिळवले. ४५ षटकांच्या एकदिवसीय सामन्यांच्या या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीसह सर्व सामने अटीतटीचे झाले.
आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे सदिच्छा स्वागत करण्यात आले.
मान्यवरांचे मार्गदर्शनपर मनोगत
ह्या स्पर्धेच्या बक्षिस वितरणाला उद्योजक आनंद आंगणे यांची अध्यक्षिय उपस्थिती तर एम. क्रिकेट ॲकॅडमी अध्यक्ष उदय नाईक, श्री. संदीप घाग, मालवण शहरचे ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटू व मुंबई विद्यापिठ स्तरीय माजी क्रिकेट कप्तान आणि माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक उद्योजक महेश कांदळगावकर, जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदिवे, ऑक्स्फर्ड क्रिकेट ॲकॅडमी व क्रिकेट क्लबचे मालक बंटी, प्रशिक्षक संदीप नाईक, माजी खेळाडू व माजी स्थानिक क्रिकेट प्रशिक्षक सुयोग पंडित, एम क्रिकेट ॲकॅडमीचे प्रशिक्षक राहुल रेगे व मान्यवर उपस्थित होते. बक्षिस वितरण समारंभाचे अध्यक्ष उद्योजक आनंद आंगणे आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांच्या कर्णधारांना आकर्षक चषक प्रदान करण्यात आले.
यावेळी संबोधित करताना, बक्षिस वितरण समारंभाचे अध्यक्ष उद्योजक आनंद आंगणे यांनी, 'स्वर्गीय राजनभाई आंगणे' ह्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजीत स्पर्धेच्या २०२६ पर्वात ( दुसरे पर्व) सहभागी खेळाडू, संघ, प्रशिक्षक व पालक यांची प्रशंसा केली. आनंद आंगणे यांनी विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले. शारिरीक तंदुरुस्ती, स्वयंशिस्त आणि जय व पराजय यानंतर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा होणारा विकास अनुभव करण्याचे मार्गदर्शनपर आवाहन केले. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेदरबाॅल क्रिकेट साठी सक्रीय अशा सर्व मंडळांची, आजी माजी खेळाडूची व त्यांना सहकार्य करत असलेल्या घटकांची प्रशंसा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रिकेटसाठीच्या आज जितक्या पायाभूत सुविधा आहेत त्यातून समोर येत जाणारी प्रतिभा ही पायाभूत सुविधांच्या वाढीनंतर आणखिन बहरत जाईल असा विश्वास आनंद आंगणे यांनी व्यक्त केला. आता जिल्ह्यातील प्रतिभावंत मुंबई, महाराष्ट्र व देशासाठी खेळताना बघता येऊ शकतील असे सर्वांगीण पोषक वातावरण निर्माण होणं गरजेचे असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. देशाच्या पंतप्रधानांनी समजावलेला 'शारिरीक तंदुरुस्तीचा' मंत्र सर्व क्षेत्रात महत्वाचा आहे असेही उद्योजक आनंद आंगणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी स्वर्गीय राजनभाई आंगणे ह्यांच्या स्मृतींना विशेष वंदन केले. श्री. महेश कांदळगावकर यांनी त्यांच्या मनोगतात क्रिकेटमधील सध्याच्या डिजीटल तांत्रिक सुविधांचा योग्य वापर करत आपला खेळ बहरवता येतो असे सांगताना आजपासून ३० वर्षांपूर्वी मात्र कुठलीच सुविधा नसून केवळ निरीक्षण, मेहनत या घटकांच्या आधारे मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघ हे मॅटवर क्रिकेट खेळले व सुप्रसिद्ध देखिल झाले. आता मालवणच्या मैदानावर प्रथमश्रेणी क्रिकेट व विविध प्रकारचे स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती करणारे जयंत गवंडे व सहकारी आणि सुरवातीला खेळपट्टी रचनेचे मार्गदर्शक तसेच वानखेडे मैदानावरचे पिच क्यूरेटर श्री. मुरकर यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.
हौशी क्रिकेट असोसिएशन जिल्हा अध्यक्ष अनिल हळदिवे यांनी इच्छुक क्रिकेट खेळाडूंसाठी प्रोत्साहनपर प्रणाली विकसीत केली जात असून यात जिल्ह्यातील आजी, माजी खेळाडूंचे यथाशक्ती थेट आणि वैचारिक योगदान देखिल अथक सुरू असते याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला.
यावेळी, अंतिम सामन्यातील सामनावीर, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व यष्टीरक्षक अशी विविध वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेत योगदान दिलेल्या सर्व पंचांच्या वतीने पंच गोविंद उर्फ बंटी केरकर यांनी स्मृतिचिन्ह स्विकारले.
यावेळी एम क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने स्पर्धेसाठी योगदान दिलेले टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड मैदान व्यवस्थापन, हितचिंतक, पालक व मान्यवरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणासाठी सहकार्य केलेले स्थानिक उद्योजक मुकेश बावकर व थेट प्रक्षेपण सहकारी यांचे त्यांनी आभार मानले.
पालक वर्गाच्या वतीने श्री. भावेश परब व श्री. पाटकर यांचे मनोगत
गुरू चिटणीस यांचे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.
यावेळी उद्योजक आनंद आंगणे, एम क्रिकेट ॲकॅडमी अध्यक्ष उदय नाईक, नगरसेवक महेश कांदळगांवकर, हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदिवे, श्री. संदीप घाग, सुयोग पंडित, एम क्रिकेट ॲकॅडमी प्रशिक्षक राहुल रेगे, ऑक्स्फर्ड क्रिकेट ॲकॅडमी संघ मालक बंटी, प्रशिक्षक संदीप नाईक, गुणलेखन ज्ञानेश केळुसकर, पंच गोविंद उर्फ बंटी केरकर, विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडू व त्यांचे पालक, लेदरबाॅल क्रिकेट प्रेमी तसेच नागरीक उपस्थित होते.
रत्नागिरी कोळंबे येथील 'सोसा' मैदानाचे मालक केतन सावंत यांनी या स्पर्धेचे लेदरबाॅल चेंडू पुरस्कृत केले तसेच ह्या स्पर्धेतील सर्व १५ सामन्यांच्या सामनावीरासाठी इंप्रेशन बांदा चे उमेश कुबडे यांनी खास टी शर्टस पुरस्कृत केले.
ह्या स्पर्धेचे उद्घाटन द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक श्री. दिनेश लाड यांच्या हस्ते झाले होते आणि या स्पर्धेत एम. क्रिकेट ॲकॅडमी (सावंतवाडी), पनवेल क्रिकेट स्पोर्टस् ॲकॅडमी (पनवेल), वेद स्पोर्टस् ॲकॅडमी (गडहिंग्लज, कोल्हापूर), मिलेनिअम क्रिकेट ॲकॅडमी( सांगली), ऑक्स्फर्ड क्रिकेट क्लब ॲन्ड ॲकॅडमी( गोवा), सावंतवाडी इलेवन ( सावंतवाडी) यांचे १६ वर्षांखालील संघ सहभागी झाले.
स्पर्धेत, सामनावीर अभिषेक लमाणे (ऑक्सफर्ड क्रिकेट ॲकॅडमी गोवा), उत्कृष्ट गोलंदाज मयांक राऊळ (एम. क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी), उत्कृष्ट फलंदाज सुमेध परब (एम. क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फरान शेख़ (ऑक्सफर्ड क्रिकेट ॲकॅडमी गोवा), उत्कृष्ट यष्टिरक्षक अर्चित दातार (मिलेनियम क्रिकेट ॲकॅडमी सांगली), मालिकावीर फरान शेख़ (ऑक्सफर्ड क्रिकेट ॲकॅडमी गोवा), मालिकावीर फरान शेख़ (ऑक्सफर्ड क्रिकेट ॲकॅडमी गोवा) यांना वैयक्तिक कामगिरीसाठी बक्षिसे देण्यात आली.
समालोचक निखिल पाटकर यांनी स्पर्धेचे धावते वर्णन केले.
स्वर्गीय राजनभाई आंगणे ह्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्पर्धेच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल तसेच आयोजनाबद्दल विशेष समाधान व्यक्त करण्यात आले असून, या स्पर्धेत तीन शतकं साजरी झालेल्या व अचूक टप्प्यावरच्या टिच्चून गोलंदाजीला बळींचं भरभरून दान दिलेल्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड मैदानावरील खेळपट्टीबद्दल उपस्थित मान्यवर, तज्ञ आणि खेळाडूंनी समाधान व्यक्त केले.
स्पर्धा आयोजनाबद्दल एम क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने प्रशिक्षक राहुल रेगे यांचे कृतज्ञतापर मनोगत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)