किल्ले सिंधुदुर्ग क्षेत्रभेट...!
किल्ले सिंधुदुर्ग क्षेत्रभेट...!
पर्यटन सप्ताहानिमित्त कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गव्हाणकर सायन्स कॉलेजच्या आयक्यूएसी आणि किल्ले प्रेरणोत्सव समिती, पर्यटन विकास व्यवसायिक महासंघ व युवा पर्यटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम.
मालवण | प्रतिनिधी : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गव्हाणकर सायन्स कॉलेजच्या आयक्यूएसी आणि किल्ले प्रेरणोत्सव समिती, पर्यटन विकास व्यवसायिक महासंघ व युवा पर्यटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन सप्ताह २०२५ : किल्ले गौरवशाली भूतकाळ (Forts Glory of the Past) या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
मराठा साम्राज्याच्या लष्करी वैभवाचे प्रतीक असलेले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रायगड आदी किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नुकतेच समाविष्ट झाले आहेत. या दुर्गांची बांधणी सागरी तसेच डोंगराळ भूभागाशी निगडीत असून ते तत्कालीन मराठा लष्करी डावपेच, वास्तुकला व सामरिक धोरण यांचे अद्वितीय उदाहरण मानले जाते. सिंधुदुर्ग किल्ला हा शिवछत्रपतींनी बांधलेला सागरी किल्ला असून आजही पर्यटन व इतिहास अभ्यासकांसाठी मोठे आकर्षण आहे.
या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर २०२५ रोजी रविवारी सकाळी ८ वाजता किल्ले सिंधुदुर्ग क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली आहे. या प्रसंगी इतिहास विषयातील तज्ज्ञ डॉ. ज्योती बुवा तोरसकर मार्गदर्शन करणार आहेत. महाविद्यालयातील मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांनी या क्षेत्रभेटीचे आयोजन केले आहे. या उपक्रमाबाबत प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, पर्यटन सप्ताह समन्वयक डॉ. सुमेधा नाईक व क्षेत्रभेट समन्वयक प्रा. कैलास राबते यांनी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी टोपी, पाण्याची बाटली, पेन व वही सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी प्रा. के. के. राबते – ८३८१०२२५२९,
डॉ. डी. व्ही. हारगिले – ९४२११८९९०७,
श्री. सौरभ चव्हाण – ९३०९०३८६७६ यांच्याशी संपर्क करावा अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
हेरिटेज टूर गाईड प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत १९ फेब्रुवारी रोजी 'मालवणचा हेरिटेज वॉक.'