स्वातंत्र्य दिनानिमित्त सिंधू रनर्सचा सावंतवाडी १२ तास रन उपक्रम उत्साहात.
सावंतवाडी | प्रतिनिधी : भारताच्या ७९ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधू रनर्स टीम कडून सावंतवाडी १२ तास रनच्या रूपाने मानवंदना देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू आणि क्रीडा प्रेमी तरुणांना स्वतःचे कौशल्य दाखवण्यासाठी आणि राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर पोहचलेल्या खेळाडूंकडून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी स्वतःचे व्यासपीठ मिळावे म्हणून सिंधू रनर्स टीमने सावंतवाडी येथे ३ तास / ६ तास / १२ तास आणि १२ तास रिले रनची संकल्पना राबवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रन आयोजन करण्याचे हे पाचवे वर्ष आहे. या वर्षी 'नृसिंह अवतार' ही संकल्पना घेऊन सावंतवाडी कला प्रकार गंजिफा देशात आणि जगात पोचवण्यासाठी टीमने प्रयत्न केले. या उपक्रमाच्या आयोजनासाठी सिंधू रनर्सचे सदस्य तसेच आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन पदकविजेते ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर, डाॅ. स्नेहल गोवेकर, भूषण बान्देलकर, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनचे डायरेक्टर रोहन मोरे आणि सहकारी यांचे सक्रीय योगदान होते.
या रन मध्ये जिल्यातील आणि जिल्ह्याबाहेरील (गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथून) ८० धावकांनी सहभाग नोंदविला. या अभिनव उपक्रमाला सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले आणि युवाराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.
ही रन १५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ८ वाजता सावंतवाडीच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या राजवाडा येथून सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले आणि डॉ. शंतनू तेंडुलकर, सिंधुदुर्ग जिल्हा ऑटो अँड टॅक्सी संघटना अध्यक्ष सुधीर पराडकर यांच्या आणि इतर मान्यवारांच्या उपस्थितीत सुरु झाली. राजवाड्यातून सुरवात होऊन पुढे सावंतवाडी मोती तलावाला १.६ किलोमीटर अंतर धावकांना ३ तास / ६ तास / १२ तास आणि १२ तास रिले रन करायचे होते. किती किलोमीटर पळायचे हे बंधन नव्हते पण धावकांनी त्यांनी निवडलेले रन टाईमिंग पूर्ण करणे बंधनकारक होते. सिंधू रनर टीमच्या मदतीला जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम आणि फिजीओ सहाय्यासाठी डॉ. शुक्ला फिजीओथेरपि क्लिनिकची टीम संपूर्ण तैनात होती.
सिंधुदुर्ग जिल्यातील काही डॉक्टर्सनी रनमध्ये सहभाग नोंदविला व सिंधू रनरच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. याच दरम्यान काही छोट्या धावकांनी ३ तासांची रन पूर्ण केली. स्पर्धेत कु. सहज बुरड, मानस सावंत, सुशोभन सावंत, स्वराज सावंत, रिहाना सारंग, इशिता, मयुष, आर्य कापडी या छोट्या धावकांचा सहभाग लक्षणीय ठरला.
१६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अचूक ८ वाजता राजवाड्यात रनची सांगता झाली.
रनचा सन्मानचिन्ह प्रदान सोहळा राजवाडा येथे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, अल्ट्रा रनर नितीन फेडते, आयर्न मॅन विनायक पाटील, अविनाश फडके, कोकण कोस्टल मॅरेथॉन डायरेक्टर प्रसाद देवस्थळी आणि महाराष्ट्र राज्य कबड्डीपटू विनायक पराडकर या मान्यवारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्व धावकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवारांनी या अभिनव उपक्रमामुळे आपल्या जिल्ह्याला आणि देशाला जागतिक पातळीवर नेणारे धावक तयार होतील, अशी आशा व्यक्त केली आणि सिंधू रनर टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या रन मध्ये प्रत्येक रन प्रकारात विजेत्या व उपविजेत्या धावकाला विशेष सन्मानचिन्ह देण्यात आले.
सावंतवाडी १२ तास रन खुल्या गटामध्ये विजेता - रॉबर्ट वाझ (४४ लूप ७२ किमी) तर उपविजेता - डॉ. प्रशांत मडव (३७ लूप ६१.५ किमी) ठरले. १२ तास संघ रिलेमध्ये विजेता - विजेता टीम सिंधू रनर (मेघराज, फ्रैंकी, तेजस्वी, सर्वेश) ६० लूप ९८ किमी ठरली तर उपविजेता टीम वेंगा फिटनेस (इशिता, मयुष, मायरन, अजेंद्र) ५६ लूप ९१.५ किमी.
६ तास रन पुरुष विजेता - अश्विन गड (२८ लूप ४६ किमी), उपविजेता रवींद्र गावडे (२६ लूप ४३ किमी) तर ६ तास रन महिला विजेती - शेरियन दूराडो (२३ लूप ३८ किमी 5 तास 53 मिनिटांत) , उपविजेती - सुजाता रासकर (२३ लूप ३८ किमी ५ तास ५६ मिनिटांत) यांनी ६ तास रनमध्ये यश प्राप्त केले.
३ तास रन पुरुष विजेता - जय पुलस्कर (१५ लूप २४.५ किमी) , उपविजेता गौरेश जाधव (१४ लूप २३ किमी) तर ३ तास रन महिलांमध्ये विजेती - आर्या कपाडी (१३ लूप २१.५ किमी) , उपविजेती - हिना आंबेरकर (१२ लूप २० किमी) यांनी ३ तास रनमध्ये यश प्राप्त केले.
या उपक्रमात सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले आणि युवाराज्ञी श्रद्धाराजे भोसले, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन टीमचे रोहन मोरे, डॉ. शुक्ला फिजीओथेरपि क्लिनिक कुडाळ, सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. नातू, अर्पण मेडिकलचे रामा गावडे, स्पोर्ट्स ७ टी शर्टस्, टीम Runbuddies (BIB ट्रैकिंग सिस्टिम), रवींद्र डेकोरेशन, नंदू गावडे यांचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल सिंधू रनर टीम तर्फे आभार मानण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)