खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्टडी ॲपचे वितरण.
खारेपाटण | ब्यूरो न्यूज : रोटरी क्लब ऑफ खारेपाटण व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या प्रशालेच्या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एकूण १०६ विद्यार्थ्यांना तर ६ वर्ग शिक्षकांना उपयुक्त असे एकूण ११२ आयडिल स्टडी ॲपचे वितरण नुकतेच रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष श्री. दयानंद कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. तर सुमारे २ लाख ६८ हजार रुपये एवढा खर्च या स्टडी ॲपसाठी करण्यात आला.

शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक प्रभावी पद्धतीने शिकता यावे व त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मिळावे या उद्देशाने रोटरी क्लब खारेपाटण यांनी हा उप्रकम राबविला असून या स्टडी ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणताही विषय अगदी सहजपणे समजणे सुलभ होणार असल्याचे प्रतिपादन खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. संजय सानप यांनी स्टडी ॲप वितरण कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, रोटरी क्लब खारेपाटणचे सचिव श्री. अजय गुरसाळे, ट्रेझरर रोट्रियन सारिका महींद्रे, रोट्रियन सुबोध देसाई, प्रियेशा अमृते, शर्मिन काझी, लक्ष्मीकांत हरियान, खारेपाटण ग्रा. पं. सदस्य मनाली होनाळे, पालक संघाचे सदस्य ऋषिकेश जाधव आदी मान्यवर तसेच शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण शिक्षणाची गरज ओळखून हे स्टडी ॲप विद्यार्थ्यांना वितरीत केले असून हे मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी अशा तिन्ही माध्यमात उपलब्ध असून विद्यार्थ्यांना हाताळायला सोपे जाणार आहे. तर अशा प्रकारचे आयडिल स्टडी ॲप रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या वतीने अजून १७५ शालेय विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येणार असल्याचा मानस यावेळी रोटरीचे अध्यक्ष दयानंद कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ खारेपाटण व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली या संस्थेच्या वतीने खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या या स्टडी ॲप बद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व सचिव महेश कोळसुलकर यांनी रोटरी क्लबचे आभार व्यक्त केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)