मालवण शहरात रिक्षा व्यावसायिकांची अनधिकृत दुचाकी व्यवसायाबाबत बैठक.
रिक्षा व्यावसायिकांच्या वतीने आंदोलनाचा इशारा.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात तसेच परिसरात पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या अनधिकृत दुचाकींमुळे अधिकृत रिक्षा व्यवसायिकांचा व्यवसाय डबघाईस आला असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या गंभीर समस्येकडे पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष पुरवीत त्यांना अधिकृत परवाने तरी द्यावेत किंवा कडक कारवाई करावी. याची दखल न घेतल्यास आम्ही रिक्षा व्यवसायिक तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा रिक्षा व्यवसायिकांच्या वतीने पप्या कद्रेकर यांनी दिला.
शहरातील तसेच पंचक्रोशीतील अधिकृत रिक्षा व्यवसायिकांनी बुधवार, ३० जुलै रोजी सायंकाळी भरड दत्त मंदिर येथे अनधिकृत दुचाकी व्यवसायाबद्दल बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी निलेश लुडबे, राजा मांजरेकर, विठू वराडकर, जगदीश सातार्डेकर, गोविंद गावकर, जयेंद्र सावजी, राजू किर, विश्वनाथ नाटेकर, प्रमोद मराळ, रामचंद्र पराडकर, साई आंबेरकर, वरद धुरी यांच्यासह परिसरातील रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.
श्री. कद्रेकर म्हणाले, मालवण हे पर्यटन शहर असल्याने लाखो पर्यटक शहर परिसरास भेटी देतात. यात वास्तव्यास असणाऱ्या पर्यटकांना शहर परिसरात अनधिकृतरित्या दुचाकी प्रवासासाठी दिल्या जात आहेत. गेल्या वर्षभरात पर्यटकांना दुचाकी देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या अनधिकृत दुचाकींमुळे अधिकृत रिक्षा व्यावसायिकांचा व्यवसाय डबघाईस आला आहे. अनधिकृत दुचाकींवर कारवाई करण्यासाठी यापूर्वी पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली होती. यात काही प्रमाणात कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने पर्यटकांना दुचाकी देणाऱ्यांचे प्रमाण सद्यस्थितीत वाढले आहे.
शहर परिसरातील अधिकृत रिक्षा व्यावसायिकांनी बँकांची कर्जे काढून रिक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे व्यवसायच न झाल्यास बँकांचे हफ्ते फेडायचे कसे असा प्रश्न रिक्षा व्यावसायिकांना भेडसावत आहे. अनेक रिक्षा व्यावसायिकांचे उदरनिर्वाहाचे साधन रिक्षा हाच एकमेव व्यवसाय आहे. काही रिक्षा व्यावसायिकांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अनेक रिक्षा व्यावसायिकांच्या उदारनिर्वाहावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करत एकतर दुचाकी व्यवसाय करणाऱ्यांना अधिकृत परवाने द्यावेत किंवा त्यांच्यावर कडक कारवाई करत आम्हाला न्याय मिळवून द्यावा. याची कार्यवाही येत्या काही दिवसांत न झाल्यास आम्हा रिक्षा व्यावसायिकांना तीव्र आंदोलन, उपोषण छेडावे लागेल असा इशाराही श्री. कद्रेकर यांनी यावेळी दिला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)