मंत्री नितेश राणे यांची किनारपट्टी भागातील नागरिकांनी शिष्टमंडळासहीत भेट.
मच्छिमार सेल संयोजक रविकिरण तोरसकर यांची माहिती.
मालवण | प्रतिनिधी : मालवण मधील किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांनी मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची रविवार, २० जुलै रोजी कणकवली निवासस्थानी भेट घेतली. किनारपट्टीवरील मत्स्य व पर्यटन व्यवसायिक तसेच निवासी घरे यांना प्रशासनाने सीआरझेड कायदा अंतर्गत नोटीसा बजावलेल्या आहेत. या संदर्भात लक्ष वेधण्यासाठी मालवण मधील माजी नगरसेविका सेजल परब व श्रमिक मच्छीमार संघटनेचे सन्मेश परब यांनी मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांच्या समवेत शिष्टमंडळासहित पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मंत्री नितेश राणे म्हणाले, हा विषय महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीचा असून याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरच धोरणात्मक निर्णय होणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सदरच्या कायद्यामुळे येणारे अडथळे याबाबत सुद्धा मार्ग निघणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या भविष्यातील धोरणात्मक निर्णयामुळे किनारपट्टी समुदायाला मोठा दिलासा मिळणार आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. प्रशासनाने बजावलेल्या नोटिसा बाबत किनारपट्टीवरील लोकांनी चिंता करू नये लवकरच याबाबत तोडगा निघेल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. केंद्र शासन स्तरावर याबाबत खासदार नारायण राणे आणि राज्य शासनाकडे मंत्री नितेश राणे यांचा पाठपुरावा चालू आहे.
यावेळी किनारपट्टीवरील निवासी घरे, मत्स्यव्यवसाय संबंधित जागेचा वापर तसेच पर्यटन व्यवसाय, घर दुरुस्ती, बांधणी व इतर अनुषंगिक गोष्टींसाठी होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा झाली. यावेळी नोटिसा बजावलेल्यांपैकी नागरिक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेविका सेजल परब, बोनी फर्नांडिस, कुशल गिरकर, नामदेव केळुसकर, विवि फर्नांडिस, रूपेश प्रभु आदी उपस्थित होते अशी माहिती रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)