आरवली ग्रामपंचायतीकडून युवावर्गासाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण...!
ब्युरो न्यूज | विवेक परब : आरवली गावातील बेरोजगार, गरजू, होतकरू, युवक-युवतींना आरवली ग्रामपंचायत मार्फत मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचा शुभारंभ ग्रामपंचायत सरपंच श्री तातोबा कुडव यांच्या हस्ते करण्यात आला. “वाहन चालक प्रशिक्षण”, “एमएससीआयटी” व “ब्यूटी पार्लर” हे तीन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यावेळी गावातील प्रशिक्षण घेणारे ८२ युवक-युवती उपस्थित होते.
आरवली ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून १४ व्या वित्तीय आयोग निधीतून आरवली गावातील गरजू, होतकरू, बेरोजगार युवक-युवतींना आरवली ग्रामपंचायत सभागृहात एकत्र करण्यात आले. यावेळी आरवली ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी विनय धाकोरकर, ब्यूटी पार्लर प्रशिक्षण संस्थेचे मान्यवर , सत्यम काँम्युटरचे अविनाश शिरोडकर, ओम साई मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे प्रकाश गावडे यांनी मार्गदर्शन केले.
याउद्घाटन कार्यक्रमाला उपसरपंच सौ. रिमा मेस्री, ग्रामपंचायत सदस्य समिर कांबळी, सायली कुडव, शिला जाधव, वैशाली रेडकर, अक्षता नाईक, प्रविण मेस्री, किरण पालयेकर व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)