वीज ग्राहकांच्या नुकसान भरपाई प्रश्नाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी आक्रमक.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तीन दिवस वीज पुरवठा खंडित असल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने, २२ मे रोजी वीज वितरण कार्यालयात धडक देत उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांना घेराव घालून जाब विचारला. पदाधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करणे आणि तीन दिवस वीज पुरवठा खंडित झाल्याबद्दल ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याच्या विषयावर आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर उपकार्यकारी अभियंता यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई संदर्भात असलेल्या शासन निर्णयाची माहिती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. दिवसभरात वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन यावेळी श्री. म्हेत्रे यांनी दिले.
दरम्यान, वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी आवश्यक असणारी यंत्र सामुग्री आणि साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे तसेच नुकसान भरपाईसंदर्भात वीज वितरण कार्यालयातून अधिकृतपणे ग्राहकांना माहिती देण्यात यावी, यासंदर्भात वीज वितरणकडून कोणतीही हयगय करण्यात आल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला.
गेले तीन दिवस मालवणात सुरू असलेल्या वीजेच्या खेळखंडोबाबद्दल ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज, २२ मे रोजी वीज वितरण कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक नितीन वाळके, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, महिला आघाडी पदाधिकारी पूनम चव्हाण, दिपा शिंदे, निनाक्षी शिंदे मेथर, भाग्यश्री ख़ान, नरेश हुले, चिंतामणी मयेकर, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, प्रसाद चव्हाण, किशोर गावकर, बंड्या सरमळकर, गणेश चव्हाण, कुणाल साळुंखे, पोईपकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)