गणपती शाळा सक्षमीकरण योजनेंतर्गत मंजूर ३ कोटी निधीतून जिल्ह्यात १५०० लाभार्थी ; मालवण तालुक्यातील २८३ जणांना लाभ.
सिंधुदुर्ग नगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुरत्न समृद्ध योजना सन २०२४ /२०२५ अंतर्गत गणपती शाळा सक्षमीकरण योजनेंतर्गत मंजूर ३ कोटी निधीतून जिल्ह्यातील १५०० लाभार्थीना माती मळणी यंत्र व कलर स्प्रे गन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मालवण तालुक्यातील २८३ लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे.
या योजनेला जिल्ह्यातील मूर्तिकारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गणपती शाळांच्या सक्षमीकरणासाठी यंत्र खरेदी करण्यासाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देणे योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जि. प. ग्रामपंचायत विभागामार्फत या योजनेच्या लाभासाठी १० ऑगस्ट २०२४ पूर्वी प्रस्ताव मागविण्यात आले होते. या योजनेला जिल्ह्यातील मूर्तिकारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून १९३९ मूर्तिकारानी आपले प्रस्ताव विहीत मुदतीत सादर केले आहेत.
७५ टक्के अनुदान अथवा २० हजार रुपये अनुदान देण्याची मर्यादा दरम्यान, या योजनेसाठी शासनाने ३ कोटी रु. निधी मंजूर केला. मात्र, विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीमुळे निवड झालेल्या पात्र लाभर्थ्याना या योजनेच्या लाभासाठी प्रतीक्षा करावी लागली. मात्र आचारसंहिता संपताच या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टिने प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. सिंधुरत्न योजनेंतर्गत गणपती शाळांच्या सक्षमीकरणासाठी यंत्र खरेदी करण्यास अर्थसहाय्य करण्यासाठी ७५ टक्के अनुदान अथवा २० हजार रुपये अनुदान देण्याची मर्यादा आहे. त्यानुसार या प्रस्तावित योजनेअंतर्गत गणपती शाळेसाठी आवश्यक माती मळण्याचे यंत्र किंवा एअर कॉम्प्रेसर (कलर गन) साठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव प्राप्त आहेत. त्याची छाननी होऊन पात्र १५०० लाभार्थीची निवड प्रशासनाने केली आहे.
कणकवली २८२ , कुडाळ ४२८, देवगड २३२, मालवण २८३ दोडामार्ग ५२, वेंगुर्ला १९०, वैभववाडी ८७, सावंतवाडी २७५ असे एकूण १८८९ प्रस्ताव ग्रामपंचायत विभागाकडे प्राप्त झाले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)