उपविभागीय अधिकारी तथा कणकवली प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने यांची तळेरे येथील "अक्षरघराला" भेट.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
“अक्षरघरात” आगमन झाल्यानंतर पहिली मिळालेली प्रतिक्रिया “वाह खूपच सुंदर.” ही आपसुक मिळालेली प्रतिक्रिया व्यक्त केली उपविभागीय अधिकारी तथा कणकवली प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने यांनी . आपल्या रोजच्या व्यस्त शासकीय कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून कणकवली प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने यांनी कोणतेही निमंत्रण न देता अक्षरघराला सदिच्छा भेट देण्याची त्यांना इच्छा झाली.आणि खुद्द प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने यांनी वैभववाडीचा दौरा आटपून येत असतांना आपला मोर्चा सरळ निकेत पावसकर यांच्या अक्षरघराकडे वळविला.एखादी उच्च पदस्थ व्यक्ती आपल्या आगळ्यावेगळया पत्र संग्रहाला अचानक भेट द्यायला येत असल्याचे ऐकून निकेत पावसकरही आनंदीत झाला.खरे तर ही गोष्ट भारावून टाकणारी अशीच होती.सुमारे दिड ते दोन तास केवळ “अक्षरोत्सव” संग्रहातील विविध मान्यवरांची संदेश पत्रे मनसोक्तपणे पाहिली. त्यादरम्यान त्यांचे अधूनमधुन येणारे प्रश्न जसे तसेच त्यांच्यातील चिकित्सक रसिकतेची उत्सुकता दिसत होती आणि त्यांचे सुक्ष्म निरिक्षणही प्रतिबिंबित होत होते.त्याचबरोबर संवादात्मक चर्चात्मक मैफिलही चांगली रंगली होती.या संदेश पत्रांच्या अनुषंगाने अनेक आठवणी, अनेक भावस्पर्शी आणि सामाजिक संदेश, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर व्यक्ती यांनी सजलेल्या या पत्रसंग्रह संपूर्णपणे न्याहाळून चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि समाधान व्यक्त केले.ही भेट म्हणजे तो एक अभुतपूर्व आनंद सोहळा होता.यादरम्यान कोणत्याही प्रकारचा इतर वेळ न दवडता फक्त रसिकतेने संपूर्ण पत्रसंग्रह त्यांनी मनापासून पाहिला. आणि जाता जाता या भेटीच्या निमित्ताने लिहिले…प्रिय निकेत,
सध्याच्या मोबाईल,इंटरनेटच्या जगात सुमारे 1700 हून अधिक मान्यवर व्यक्तींच्या पत्रांचा संग्रह तु केला आहेस. ही निश्चितच अदभुत गोष्ट आहे.
प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निजनामें तयावरी गोंदा या कविवर्य विं. दा. करंदीकर यांच्या स्फूर्तीदायक काव्याप्रमाणे तुझे हे ‘अक्षरलेणे’ कालातीत आहे.या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढून शुभेच्छा देत निरोप घेतला.
यावेळी तळेरे मंडळ अधिकारी संतोष नागावकर, कवी, लेखक आणि अभिनेते प्रमोद कोयंडे, तंबाखू प्रतिबंध अभियानच्या सौ.श्रावणी मदभावे आणि सतिश मदभावे, चित्रकार अक्षय मेस्त्री,पत्रकार संजय खानविलकर,दारुम उपसरपंच भरत चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, तळेरे कोतवाल रमेश तांबे, चालक श्री.जोगळे आणि सौ.सुनयना पावसकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने यांना प्रमोद कोयंडे यांनी आपले “सोबतीन” हे पुस्तक तर प्रज्ञांगण परिवाराकडून दिपावलीच्या “पणत्या” भेट देण्यात आल्या.तळेरे गावातील हि कलासक्त माणसे पाहून पुन्हा एकदा तळेरे गावाला भेट देण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)