भाजपा नेते निलेश राणे यांचा रुद्रावतार ; नगरपरिषद मुख्याधिकार्यांसह आमदारांवर थेट निशाणा.
मालवण | विनीत मंडलिक : भाजपा नेते आणि माजी खासदार डाॅ निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेत दाखल झाले.
पावसातच मालवणमधील गटार,नाले वगैरे मूलभूत सोयींचा उडालेला बोजवारा व इतर मुद्द्यांवर नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारण्यासाठी भाजपातर्फे डाॅ.निलेश राणे हे नगरपरिषदेत दाखल झाले.
दाखल होताच डाॅ.निलेश राणे यांनी मुख्याधिकार्यांवर मालवणमधील समस्यांचा व प्रश्नांचा भडिमार सुरु केला. मालवणमधील विकासकामे अपूर्ण असताना ठेकेदारांची बिले कशी काय पोच आहेत व या प्रकरणाची वरुन चौकशी करायचा इशारा भाजपा नेते निलेश राणे यांनी दिला.
आमचे इशारे हे धमकी वाटली तर धमकी समजा परंतु आता मालवण शहरच्या विकासकामात हयगय बिलकूल चालणार नाही आणि आपण या पूर्वीच्या सर्व हयगयींची सखोल चौकशी करणारच असे त्यांनी सांगितले. गेले काही महिने नगरपरिषद प्रशासन स्थानिक आमदार व माजी सत्ताधारी यांच्या बाजुचीच कामे करत आहे आणि विरोधी नगरसेवकांना कचर्यासमान वागणूक देऊन त्यांच्या प्रभागातील विकासकामे रखडवत असल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी केला गेला. मालवण शहरातील आम्ही सांगू ती प्रस्तावीत विकासकामे झालीच पाहिजेत असे सांगत भाजपा नेते निलेश राणे यांनी भाजपाला अपेक्षित विकास कामांची यादी मुख्याधिकार्यांकडे सोपवली.
प्रचंड संतप्त व तणावग्रस्त अशा या भेटीमध्ये माजी खासदार व भाजप नेते डाॅ निलेश राणे यांच्यासोबत भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर, भाजपा तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, माजी नगराध्यक्ष व भाजपा नेते सुदेश आचरेकर,जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर,माजी नगरसेवक गणेश कुशे, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, शहर अध्यक्ष ललित चव्हाण,भाजपा नेते अशोक सावंत व असंख्य भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व माजी नगरसेवक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)