<em>बापलेकीने दिले वानराच्या जखमी पिल्लाला जीवदान..!</em>
मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे खेरवंद येथील रस्त्यावरती गाडीच्या धडकेमुळे जखमी अवस्थेत निपचित पडलेल्या एका वानराच्या पिल्लाला मसुरे येथील प्राणी मित्र आणि सर्पमित्र श्री रमण पेडणेकर आणि त्यांची कन्या चिंतनी पेडणेकर यांनी पाणी पाजुन आणि औषधोपचार करून सदरच्या पिल्लाला जीवदान दिले आणि हे वानराचं पिल्लू चांगल्या स्थितीत झाल्यानंतर त्याला पुन्हा तेथील जंगलात सोडून दिले. सदर वानराचे पिल्लू झाडावरती गेल्यानंतर दुरूनच या दोघांना खूप वेळ पाहत राहिले होते या दोघांनीही रस्त्यावरूनच सदरच्या पिल्लाला निरोप दिला. बऱ्याच वेळानंतर सदरचे वानराचे पिल्लू झाडावरून उड्या मारत जंगलात पसार झाले.
याबाबत अधिक वृत्त असे की मसुरे खेरवंद बागायत या रस्त्यावरती खेरवंद या ठिकाणी रस्त्यालगतच एक वानराचे पिल्लू निपचित जखमी अवस्थेत पडले होते याच रस्त्यावरून मसुरे कावावाडी येथील प्रसिद्ध सर्पमित्र आणि प्राणी मित्र रमण पेडणेकर आणि त्यांची कन्या चिंतनी पेडणेकर या आपल्या कामासाठी जात होत्या. रस्त्यावरती जखमी अवस्थेत या वानराच्या पिल्लाला पाहून रमण आणि त्यांची कन्या तिथेच थांबली. एखाद्या गाडीच्या धक्क्यामुळे सदर वानराचे पिल्लू जखमी झाले होते असा प्राथमिक अंदाज रमण यांनी यावेळी काढला होता.त्या पिल्लाला उचलून घेतले आणि सर्वप्रथम पाणी पाजले तसेच प्राथमिक औषधोपचारही केला. त्या पिल्लाला बिस्किट वगैरे खाऊ ही दिलं. या नंतर काही क्षणात सदरचे वानराचे पिल्लू ताजे तवाने झाले. जेव्हा हे पिल्लू पूर्ण बरे झाले याची खात्री पटल्यानंतर रमण पेडणेकर यांनी सदरच्या पिल्लाला लगतच्या जंगलामध्ये सोडले असता सदरचे पिल्लू झाडावरती जाऊनही कितीतरी वेळ आपल्याला जीवदान देणाऱ्या या दोघांकडेही पाहत बसले होते.नंतर काही क्षणानंतर ते पिल्लू जंगलामध्ये उड्या मारत पसार झाले. रमण पेडणेकर ने आजपर्यंत अनेक मुक्या प्राण्यांना पशुपक्ष्यांना जखमी अवस्थेत औषधोपचार करून जीवदान दिलेले आहे. त्याचप्रमाणे रमण पेडणेकर हे मालवण तालुक्यामध्ये सर्पमित्र म्हणूनही सर्वांमध्ये प्रसिद्ध आहेत. रमण आणि त्यांची मुलगी चिंतनी या दोघांच्या या चांगल्या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)