<em>चौथा जागतिक मराठी उद्योजगता दिवस उत्साहात साजरा..!</em>
मुंबई | ब्यूरो न्यूज :
एका सर्वसाधारण व्यवसायिक समितीने मागील तीन ते चार वर्षात मराठी उद्योजकांसाठी चांगले उपक्रम राबवून, भरीव असे काम करत विशेषता कोरोनाच्या कठीण काळात सुद्धा नियम पाळून शक्य होतील तितक्या भेटीगाठी आणि ऑनलाईन उपक्रमांच्या माध्यमातून आता युनायटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स या नावाने मराठी समाजातील उद्योजक, व्यवसायिक, व्यापारी, कारखानदार व गुंतवणूकदार यांच्यासाठी स्वतःचे असे दमदार व्यासपीठ उभारण्यात पर्यंत मजल मारलेली आहे . २० जून २०२२ सोमवार रोजी सलग चौथ्यांदा आद्य मराठी उद्योजक कै. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जयंती दिनानिमित्त जागतिक मराठी उद्योजकता दिवस साजरा करताना मराठी उद्योजकांना नेमके काय हवे याची अचूक माहिती घेऊन त्यावर खात्रीशीर मार्ग शोधण्यासाठी एका उपयुक्त अशा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉक्टर शिरोडकर हायस्कूल-परळ-मुंबई येथे सायंकाळी ५ ते ९ या वेळेत केले होते.
ज्यात महाराष्ट्र शासनाचे उद्योग अधिकारी मुंबईतील नामवंत व्यापारी संस्थेचे अध्यक्ष तसेच प्रख्यात कंपनी सचिव व व्यवसाय अर्थ सल्लागार व दीडशेहून अधिक मराठी उद्योजक सामील झाले होते.
शासकीय अधिकारी श्री विलास कुमठेकर आणि श्री प्रदीप सावंत यांचे मार्गदर्शन:
(अधिकारी, अनुक्रमे महाराष्ट्र उद्योग संचालनालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र)
सरकारच्या 143 योजना आहेत. CMEGP या योजनेवर महाराष्ट्र सरकार जास्त लक्ष देत आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय उद्योजक केंद्रे आहेत मुंबई आणि ठाणे शहरासाठी देखील ही केंद्रे अत्यंत चांगल्या रीतीने काम करण्यासाठी सज्ज आहेत आणि ती करतही आहेत
उच्चस्तरीय सरकारी अधिकारी Weekly Review घेतात. उद्योजकेतसाठी सरकार जलद गतीने काम करत आहे पण मराठी माणूस त्याचा फारसा फायदा घेत नाहीये. तरी मराठी उद्योजकांनी आपल्या मानसिकतेवर काम करून व ती सकारात्मक बनवून याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायला हवा आणि स्वतःची व समाजाची प्रगती करायला हवी. यासाठी आम्ही देखील सरकारी अधिकारी म्हणून आणि व्यक्तिशः सर्व उद्योजकांना मदत करण्यास कायम उपलब्ध राहु. सदर चेंबरने असेच अनेक कार्यक्रम वारंवार घ्यायला हवेत आणि आम्ही देखील या माध्यमातून सर्व मराठी उद्योजकांना आवाहन करीत आहोत.
श्री अनिल फोडेंकर सर यांचे मार्गदर्शन:
(अध्यक्ष, मुंबई व्यापारी असोसिएशन)
महाराष्ट्र सरकार मध्ये OBC, ST/SC असे आणखी काही महामंडळ आहेत. यांच्याकडे साधारण एकूण ₹3000 कोटी रुपयांचा निधी आहे. सर्वच जाती समाजातील उद्योजकांनी अशा महामंडळाकडून मदत घेयला हवी.
सरकारी योजनांचा लाभ घ्या, एकत्र या आणि सरकारला प्रश्न विचारा. आपलाच कररूपी माध्यमातून मिळालेला पैसा सरकारकडे असतो. त्यामुळे त्यावर आपला प्रथम अधिकार आहे. मुंबई व्यापारी असोसिएशन आणि अवनी ट्रस्ट ही बिझनेस ऑन विल्स च्या माध्यमातून मराठी उद्योजक काम करता गेली कित्येक वर्ष काम करीत आहे आणि करीत राहील. सदर चेंबूरला असे उपक्रम राबवण्यासाठी मी आणि माझी संस्था कायम सहकार्य करेल.
श्री हर्षद माने सर यांचे मार्गदर्शन:
(कंपनी सचिव, तसेच व्यवसाय आणि अर्थ सल्लगार)
मराठी समाजातील कुटुंबांनी यापुढे तुमचा मुलगा कुठे नोकरी करतो यापेक्षा तुमचा मुलगा कोणता व्यवसाय करतो अशी सकारात्मक मानसिकता तयार करून आपल्या कुटुंबातील नव्या पिढीला प्रोत्साहन दिले पाहिजे. नोकरीत लगेचच होम लोन च्या कर्जात अडकून घर घेण्यापेक्षा नियमित उत्पन्न देणारी Industrial Property चे मालक व्हा . इतर उद्योजक समाजानं वर टीका करण्यापेक्षा त्यांच्या सोबत रहा . एक पाय गुजराती लोकांसोबत आणि एक पाय मराठी लोकांसोबत ठेवा. गुजराती लोकांकडून अनेक व्यावसायिक धडे मिळतील. आपल्यातील दोस्त बघून त्यावर काम करायला हवे. मुंबई शेअर मार्केट ची स्थापना एका मराठी माणसाने केली होती हे विसरून चालणार नाही, त्यामुळे मराठी समाजाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यावरही आता आपला ठसा उमटवला पाहिजे. मराठी समाजाने दहा हजार कोटी रुपयांपर्यंतची स्वतःची अशी मोठी गुंतवणूक उभी करायला हवी आणि त्या माध्यमातून सरकारवर आपला दबाव आणायला हवा. मी स्वतः कोकणकन्या डॉट कॉम सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट वर काम करून कोकणातील अनेक उत्पादने महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी काम करत आहे. एकूणच मराठी भाषा शाळा चित्रपट भूमिपुत्रांचे हक्क याचे सगळे मूळ मराठी समाजाच्या आर्थिक सबळतेत आहे. तरी सदर चेंबर जे उत्तम असे मराठी उद्योजकांसाठी काम करत आहे त्यांच्यासोबत तसेच मी व्यक्तीश: स्वतः देखील मराठी उद्योजकांना सहकार्य करायला नेहमीच तयार आहे आणि असेन. मराठी उद्योजकांनी अशा चेंबरच्या संपर्कात किंवा त्यांचे सदस्य होऊन स्वतःची प्रगती साधायला हवी.
एकूणच सोहळ्यातील मान्यवर वक्त्यांनी तसेच चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय योजना मराठी समाजाची मानसिकता भविष्यातील वाटचाल याबद्दल परिपूर्ण असे मार्गदर्शन करून, उपस्थित मराठी उद्योजकांशी उत्तम असा संवाद साधला, आणि या चौथ्या जागतिक मराठी उद्योजकता दिवसाच्या निमित्त आयोजित व्यावसायिक सोहळ्याची अर्थपूर्ण अशी सांगता केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)