टोपीवाला हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी श्री.दत्तप्रसाद खानोलकर यांची नियुक्ती…!
मालवण | सुयोग पंडित :
गेली १११ वर्षे ज्ञानदानाचे अविरत कार्य करणाऱ्या अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार दत्तप्रसाद खानोलकर यांनी आज स्वीकारला. तर पर्यवेक्षक पदाचा कार्यभार सुभाष प्रभुखानोलकर यांनी घेतला.
टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय जोशी हे काल सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर श्री. खानोलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दत्तप्रसाद खानोलकर यांनी उपशिक्षक म्हणून गेली ३३ वर्षे अध्यापनाचे कार्य केले आहे. प्रशालेतील सेवाज्येष्ठतेनुसार ते मुख्याध्यापक पदी नियुक्त झाले आहेत. विज्ञान व गणित विषय शिकवण्यात उत्तम हातोटी असणारे शिक्षक म्हणून दत्तप्रसाद खानोलकर ओळखले जातात.
विज्ञान विषयाचे ज्येष्ठ शिक्षक सुभाष वासुदेव प्रभुखानोलकर यांनी शाळेचे पर्यवेक्षक म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी मालवण एज्यूकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व टोपीवाला परिवाराने दोन्ही ज्येष्ठ शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)