मिरची खरेदीसाठी बांदा बाजारपेठेत ग्राहकांची लगबग
बांदा | राकेश परब : गोवा बाजारपेठेवर कायम अवलंबून असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील मिरची उत्पादकांना यावर्षी बांदा बाजारपेठेत मोठी मागणी आली. अतिवृष्टी व अवकाळीचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला असून मिरचीचे भाव मात्र कडाडले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेत आवक निम्म्यावर घटली असून पुढच्या आठवड्यात मिरची आणखीन तिखट बनणार असल्याचे भाकित विक्रेत्यांनी वर्तविले आहे.
मिरचीच्या दरवाढीने वर्षभराच्या चटणीची तजवीज करणाऱ्या बांदा दशक्रोशीसह परिसरातील सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. गावठी मिरचीचे दर वाढीव असल्याने ग्राहक कमी प्रमाणात खरेदी करून संकरित मिरच्यांना मोठी पसंती देत असल्याचे दिसून आले. गावठी मिरचीचे दर 850 ते 1100 रुपये किलो होते. तर कर्नाटक-हुबळी येथून आलेल्या कलर तिखट मिरची 280 रुपये किलो, कलर मिरची http://localhost/news/public/uploads/200 रु., तिखट मिरची 350 रु., काश्मीरी मिरची 450, अस्सल बेडगी मिरची 450 रु., लवंगी मिरची 300 रुपये भाव मिळाला.जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मडुरा पंचक्रोशीसह बांदा दशक्रोशीतील मिरची उत्पादकांना बसला. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी अनेक फवारणी केल्या मात्र पदरी निराशाच पडली. मिरचीची रोपटे वरूनच मरत चालली होती. काही ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांनीही आपली शक्कल लढवली परंतु अवकाळी पावसामुळे आलेल्या रोगासमोर सर्वकाही फिके पडले. त्यामुळे मुळातच तोट्यात गेलेला मिरची उत्पादक शेतकऱ्यावर सद्यस्थितीत कर्जबाजारी होण्याची वेळी आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)