'कर्ज देतो, शिवसेनेत प्रवेश करा' हाच होता सतिश सावंतांचा नारा ; वैभववाडी भाजपा महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे यांचा आरोप…!
वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर भाजपा वैभववाडी महिला तालुकाध्यक्ष यांनी जिल्हा बँकेचा राजकीय आखाडा बनविला होता असा आरोप केला आहे.
वेगवेगळ्या शाखांत बसून विरोधकांना कर्जांची आमिषं दाखविण्याचे काम ते करत होते. ‘शिवसेनेत प्रवेश करा, मग तुम्हाला लागेल तेवढे कर्ज देतो’ अशी ऑफर तथा नारा सतीश सावंत यांनी आपल्यालाला दिला होता असा गौप्यस्फोट वैभववाडी भाजपा महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे यांनी केला आहे.
जिथे राणे साहेब तिथे आपण असल्याचे समीकरण कायम आहे असे प्राची तावडे यांनी सांगत शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी सतीश सावंत वेगळ्या पद्धतीने दबाव टाकत होते असा गंभीर आरोप केला आहे. 25 लाखांपर्यंत कर्ज मिळवून देतो. पण सेनेत प्रवेश करावा लागेल अशी त्यांनी मला अट घातली होती. त्यांनीच बँकेत मनमानी केली व पदाचा दुरुपयोग केला असा आरोप प्राची तावडेंनी प्रसिद्धीपत्राद्वारे केला आहे.
माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना आमिष दाखवून प्रवेश करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून गळ घातली जात होती. काही नातेवाईक त्यांचे एजंट असल्यासारखे वागत होते. पण वैभववाडीत त्यांच्या भूलथापांना कोणी बळी पडले नाही. बँकेत बसून खोटेनाटे उपद्व्याप करण्याचे काम सतीश सावंत यांनी केले आहे. अनेक वेळा त्याचे नातेवाईक आणि दुसऱ्यांकडूनही प्रवेशाची ऑफर दिली जात होती.
विधानसभा निवडणुकीतही वसुलीच्या नावाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःचा प्रचार करायला सतीश सावंत यांनी लावला होता. दरम्यानही दुस-यामार्फत आपल्याला कर्जाचे आमिष दाखवून प्रचार करण्यासाठी सांगण्यात आले होते. परंतु मी त्यांच्या आमिषाला बळी पडली नाही असे प्रसिद्धीपत्रकातून प्राची तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)