ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे आक्रमक…!
आंदोलनाचा दिला इशारा..!
वैभववाडी | ब्युरो न्यूज : धनगर समाजाच्या(NT C) राखीव जागेवर दुसऱ्याच्या प्रवर्गातील कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पदोन्नती दिल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्राद्वारे उघड झाले आहे. धनगर समाजावर हा अन्याय असून त्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे केली आहे.
तसेच चौकशी करून कारवाई न केल्यास आंदोलन छेडू असा इशारा ही महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी दिला आहे.
महासंघाचे कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज काळे यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत निवेदन सादर करून लक्ष वेधले आहे. आरोग्य विभागाकडील भटक्या जमाती ‘क’ म्हणजेच धनगर समाजाच्या राखीव जागेवर भटक्या जमाती ‘ब’ व इतर समाज प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली गेली आहे. त्यामुळे धनगर समाजावर हा अन्याय आहे.
भटक्या जमाती ‘क’ या राखीव जागेवर भटक्या जमाती ‘ब’ प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत कोणतेही शासन निर्णय नसताना जाणीवपूर्वक धनगर समाजाच्या आरक्षणावर अन्य प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली गेलेली आहे. हे कागदपत्रांच्या आधारे प्रकाशात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत सविस्तर चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी. अन्यथा नियम धाब्यावर बसवून धनगर समाजावर अन्याय करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन नियमावलीचे कागदपत्र देऊन सत्कार करू असा इशारा महासंघाने दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)