देवदिवाळीला गुराख्यांचा आवडता सण-गवळदेव या दिवशी गावात वार्षिक जत्रोत्सवही असतो वाघापासून गुरांचे रक्षण व्हावे यासाठी गवळदेवाकडे सर्वांचे साकडे.
शिरगाव/संतोष साळसकर
कोरोनाचे संकट अजूनही जगाला सतावत असतानाच आता “ओमीक्रोन”चे नवे संकट आले आहे.असे असतानाही कोकणी माणूस तेव्हड्याच उत्साहाने आणि श्रद्धेने आपले वार्षिक सण साजरा करत आहे.दिवाळीनंतर देवदिवाळीला कोकणात मोठ्या भक्तिभावाने “गवळदेव”हा सण साजरा होतो. उद्या रविवारी ५ डिसें. ला हा सण आहे.
कोकणात भातकापणी झाली की सर्वांना वेध लागतात ते “गवळदेव” या गुरख्यांच्या सणाचे.सत्ययुगात श्रीकृष्णाने गुरे राखताना आपल्या संवगद्याना शिकवलेला हा उत्सव आजही कलियुगात कोकणात सर्वत्र मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो.
आजच्या यांत्रिकयुगात शेती करण्यासाठी वेगवेगळी अवजारे तयार झाल्याने गोठ्यातील गुरे कमी झाली.बैलांच्या सहाय्याने शेती नांगरली जायची.आता त्याजागी “पावरटिलर” आले आणि गुरांची संख्या कमी झाली.पूर्वी माळरानावर गुरे चरण्यासाठी गुराखी घेऊन जायचे.या गुरांचे वाघापासून,रानटी हिंश्र प्राण्यापासून रक्षण करण्यासाठी गुराखी गवळदेवाला साकडे(गाऱ्हाणे) घालतात.या गवळदेवाला आणि वाघोबाला वर्षातून एकदा देवदिवाळी दिवशी नैवेद (वाडी) दाखउन सर्वजण आनंदाने स्नेहभोजन करतात.
या सणाच्या आदल्यादिवशी या गवळदेवाजवळील जागा साफसूप करून शेणाने सारवली जाते.आणि देवदिवाळी दिवशी सर्व गावकरी,गुराखी मंडळी सकाळी एकत्र जमून जेवणाची तयारी करतात.मुले रानातून लाकूडफाटा गोळा करतात.गवळदेवाजवळ मातीचा वाघ बनवून या सर्वांची मनोभावे पूजा करून गोड नैवेद दाखविला जातो. डाळ-भात, भोपळ्याची,गोडी बटाट्याची भाजी,वडे,कांदेभजी आणि सोबत सोलकडी असा जेवणाचा मेनू असतो.रानातील या जेवणाचा , वड्यांचा खमंग वास सर्वत्र पसरतो.वडे हा गवळदेवाच्या जेवणातील खास मेनू.जेवणासाठी पत्रावळी,केळीची,चवईची पाने वापरली जातात.जेवताना पंगतीचे श्लोक म्हटले जातात.यावेळी लहान मुलांचा उत्साह मोठा असतो.
सर्वांचे जेवण झाले की मग वाघ पिटाळण्याच्या” कार्यक्रमाची सुरुवात होते.यावेळी लहान मुलापैकी एका चपळ आणि हुशार मुलाला “वाघ”बनविण्यात येते.त्याच्या गळ्यात वड्यांची माळ घातली जाते. मग बाकीचे सर्वजण गवळदेव,मातीचा बनवलेल्या वाघाभोवती ५ प्रदक्षिणा घालून “त्या वाघरुपी” मुलाला स्वतःभोवती ५ प्रदक्षिणा घालायला सांगितले जाते.त्याची शेवटची पाचवी प्रदक्षिणा पूर्ण होते न होते तोच तो वाघ बनलेला मुलगा पळू लागतो.मग बाकीची मुले हातात शेणाचे गोळे घेऊन त्याचा पाठलाग करतात,आणि वाघाला धारा..वाघाला मारा.. वाघाला पिटाळा असे ओरडत त्याच्या मागे लागतात. तो सर्वांचा मार चुकवत गावच्या सीमेपर्यंत जातो.मग सर्व मुले जवळच्या पाणवठ्यावर आनंदाने,हसत-खेळत आंघोळ करून माघारी फिरतात.असा हा कार्यक्रम सायंकाळी उशिरापर्यंत चालू असतो.त्यानंतर गावकरी मंडळी रात्री जवळच्या कुठल्या जत्रेला जायचे हा बेत आखतात.अतिशय खेळीमेळीच्या आणि भक्तिमय वातावरणात हा गवळदेव उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला मुंबईहून खास चाकरमानी पण येतात कारण या उत्सवाबरोबर त्यांना गावातील जत्रेचाही आनंद घ्यायचा असतो.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)