मसुरे मध्यमवयीन तरुणाची गळफास घेत आत्महत्या..!
पोलिस करत आहेत पुढील तपास…..!
मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मसुरे देऊळवाडा – लांबी येथील सेंटरिंग कारागीर विकास वासुदेव बागवे (४० वर्ष) याने घरा लगतच्या मांगराच्या छतास दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. सदर आत्महत्येची घटना बुधवारी रात्री ९ ते ९ .१५ च्या दरम्यान घडली. वडील वासुदेव बागवे याना विकास याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्या नंतर याबाबतची घटना मसुरे पोलिसाना कळविण्यात आली. पंचनामा केल्या नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे गुरुवारी शवविच्छेदन करण्यात आले. शालेय शिक्षणानंतर पुणे येथे काही वर्ष नोकरी केल्यानंतर तो गोवा येथे चौगुले शिप कंपनीत नोकरीस होता. गावी आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी सेंटरिंगचे काम तो करायचा. गावातील धार्मिक, सामाजिक कार्यात तो सक्रिय सहभागी असायचा. विकास हा गुणी नाट्यकलावंत होता. अनेक प्रकारच्या नाटकातील भूमिका तो उत्कृष्टपणे साकारत असायचा. येत्या डिसेंबर मध्ये मसुरे देऊळवाडा श्री भरतेश्वर मंदिर नजीक श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी निमित्त गावातील स्थानिक नाट्य मंडळाच्या वतीने सादर होणाऱ्या नाटकामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. बुधवारी रात्री घरातून बाहेर पडतानाही त नाटकाच्या तालमीला जातो असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता.
सहा पोलीस निरीक्षक श्री चव्हाण यांनी बुधवारी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. गुरुवारी दुपारी देऊळवाडा येथील स्मशानूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पश्चात वडील, आई, काका, विवाहित बहीण, भावोजी, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. वीज वितरण कर्मचारी रुपेश सावंत यांचे ते भावोजी होत.अधिक तपास मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. बी. नाईक, विवेक फरांदे करत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)