ताज्या बातम्या
'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..! उजळती दृष्टी आणि स्वप्नवत सृष्टी..! सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर रोजीच्या स्थानिक सुट्टीच्या तारखेत बदल. खासदार नारायण राणे यांच्याकडून हुंबरट येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी. मालवण ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा बलिप्रतिपदे दिवशी ऐतिहासिक पालखी सोहळा. एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड. यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..! कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.
'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..!

'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती...!

Article image

मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांची 'झिरो टाॅलरन्स' नीती आणि मत्स्यविभागाच्या दक्षतेने देवगड मुणगे समोर बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई.

Article image

देवगड | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची बेकायदेशीर मासेमारी विषयक 'झिरो टाॅलरन्स' नीती व मत्स्यविभागाची दक्षता याची पुनश्च प्रचिती आल्याची प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत आहे.


मत्स्यविभागाच्या 'शितल' गस्ती नौकेच्या साहाय्याने, देवगड तालुक्यातल्या मुणगे समोरील समुद्री क्षेत्रात तसेच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील मलप्पी बंदरातील 'सुलतान' ह्या ट्राॅलरचा पाठलाग करत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे २३.०० वाजता नियमित गस्तीदरम्यान 'सुलतान'वर ही कारवाई झाली असल्याचे समजते. मुणगे समोरील समुद्रात सुमारे ५-६ नॉटिकल मैल अंतरावर ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. मत्स्य विभागाच्या 'शितल' गस्ती नौकेला पहाताच 'सुलतान' ट्राॅलरने तिथून धूम ठोकायचा प्रयत्न देखिल केला होता असे समजते. नंतर 'सुलतान' ट्राॅलरचा पाठलाग करून देवगड समोरील समुद्रात पकडण्यात आले. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ आणि सुधारित अधिनियम, २०२१ मधील तरतुदींनुसार नौका पाठलाग करून ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी होते. नौका सुरक्षितपणे देवगड बंदरात आणल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कार्यवाही सुरू होती. संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.


मलप्पी बंदरातील नौकांकडून स्थानिक मच्छिमार यांची वारंवार जाळी तोडली जात असल्याची तक्रार मालवण व देवगड परिसरातील स्थानिक मच्छिमारांनी केली होती. त्यानंतर विभागाचे अधिकारी अनेक दिवसांपासून मलप्पी बंदरातील महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या नौकेचा मागोवा घेत होते. गेल्या पाच दिवसांत दोन वेळा महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या मलप्पी नौका पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र सदर मासेमारी नौका गस्ती नौकेपेक्षा अधिक क्षमतेची असल्याने दोन्ही वेळा थोडक्यात निसटल्या होत्या असे समजते. तरीही अधिकाऱ्यांनी हार न मानता पाठलाग सुरू ठेवला आणि अखेर तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करणारी मलप्पी नौका विभागाच्या ताब्यात आली. रात्री झालेल्या या कारवाईत, मत्स्यविभागाच्या पथकाचे मालवणचे अंमलबजावणी अधिकारी प्रतीक महाडवाला आणि देवगडचे अंमलबजावणी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी नेतृत्व केले तर सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक दीपेश मायबा, दिवाकर, संतोष ठुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्नील सावजी यांनी सहकार्य केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स