श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यारंभाच्या आदेशाची नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांची माहिती.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात आगामी गणेशोत्सव सण निर्विघ्न आणि उत्साहात संपन्न व्हावा यासाठी मालवण नगरपालिकेकडून शहरात विविध नागरी सोयीसुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, गणेश विसर्जन स्थळांची दुरुस्ती, पार्किंग झोन तयार करणे यासह विविध कामांना मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. ही सर्व कामे लवकरच पूर्ण केली जातील, अशी माहिती नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी दिली आहे.
मंगळवार, २८ जुलै रोजी संपन्न झालेल्या नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरपालिका निधी आणि वार्षिक ठेकेदारीतून आवश्यक कामांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ३१ जुलै रोजी या कामांचे कार्यारंभ आदेशही जारी करण्यात आले आहेत. गणेशोत्सवात नागरिकांची व पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे तत्पर आहे. नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक रस्त्यांवरील खड्डे पावसाचा अंदाज घेऊन गणेशोत्सवापूर्वी बुजवले जाणार आहेत. मालवण कचेरी, फोवकांडा पिंपळ, भरडनाका ते देऊळवाडा या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीतील मुख्य रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर या कामाचा पाठपुरावा करत आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या देखरेखीखाली डास प्रतिबंधक फवारणी मोहीम राबवली जात आहे.
गणेश विसर्जन स्थळांची दुरुस्ती करून जलस्रोतांमधील गाळ काढला जात आहे. विसर्जनासाठी वाळूचे रॅम्प आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे. सणादरम्यान शहरात वाढणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता पार्किंग झोन तयार केले जाणार आहेत. यासाठी बॅरिकेट्स, माहिती फलक, वाहनतळांचे सीमांकन आणि पट्टे मारण्याची कामे केली जातील. याशिवाय शहरातील बंद किंवा नादुरुस्त स्ट्रीट लाईट्सची दुरुस्ती केली जात आहे.
ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती तथा नगरसेविका पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव यांच्यासह नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेविका महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर आणि नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेवक मंदार केणी, स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, स्विकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर, नगरसेविका भाग्यश्री मयेकर व नगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे.
गणेशोत्सवाचा काळ मालवण मधील नागरिक आणि भाविकांसाठी सुकर व विनासायास संपन्न व्हावा, हाच ध्यास असून सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय सहकाऱ्यांच्या मदतीने ही कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील असे नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी स्पष्ट केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)