पनवेल येथील अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाच्या चिंतन शिबीरात महासंघ अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांचे मार्गदर्शनपर संबोधन.
गाबीत समाज मुंबई महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष सुजय धुरत, विश्वस्त मदन जुवाटकर, शंकर पोसम, सरचिटणीस बाळा मणचेकर, गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र खोबरेकर, आंतरराष्ट्रीय किर्तीचे पर्यटन अभ्यासक डॉ. श्याम चौगुले, कोलंबी उद्योजक ॲड. काशिनाथ तारी, उद्योजक नंदकुमार हरम, नारायण आडकर, रतनकुमार झाजम यांची उपस्थिती.
ब्यूरो न्यूज : अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे दोन दिवसीय चिंतन शिबीर पनवेल येथील एम. जे. रिसॉर्ट येथे १८ व १९ जुलै रोजी संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष, माजी आमदार परशुराम उपरकर, गाबीत समाज मुंबई महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष सुजय धुरत, विश्वस्त मदन जुवाटकर, शंकर पोसम, सरचिटणीस बाळा मणचेकर, गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र खोबरेकर, आंतरराष्ट्रीय किर्तीचे पर्यटन अभ्यासक डॉ. श्याम चौगुले, कोलंबी उद्योजक ॲड. काशिनाथ तारी, उद्योजक नंदकुमार हरम, नारायण आडकर, रतनकुमार झाजम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर उपरकर यांनी गाबित समाजातील राज्यस्तरीय संघटन आणि प्रशासकीय बाबी यावर प्रबोधनात्मक विचार मांडले.
अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले, महाराष्ट्रात गाबीत समाजाला निसर्गतः किनारपट्टीची देणगी लाभली आहे. त्याचा लाभ घेऊन समाजातील लोकांनी समुद्री पर्यटन आणि चांगले शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत. तसेच गाबीत समाज संघटनांनी शिक्षण व रोजगारासाठी चळवळ उभारावी, असे आवाहन त्यांनी केले.
या दोन दिवसीय शिबिरामध्ये महाराष्ट्रातील गाबीत समाजातील जडणघडण, विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम, किनारपट्टीवरील नैसर्गिक संकटे, गाबीत समाजातील लोकांचे जातपडताळणीचे प्रश्न, राहत्या घरांचे प्रश्न, मासे विक्रेत्या महिलांचे प्रश्न, केंद्र व राज्य शासकीय अनुदानाच्या सवलती मिळविणे, वधू - वरांचे विवाहविषयक अडचणी दूर करणे, गाबीत समाजातील लोकांनी खाडी व समुद्र किनारी पर्यटन उद्योग राबविणे अशा अनेक विषयांवर सविस्तर मुक्त संवाद साधण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड भागात गाबीत समाजाची लोकवस्ती असून येथील आंबा आणि मासेमारी व्यवसायावर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून शासनाने होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पा बाबत अणुऊर्जा तज्ज्ञांना आणून गाबीत वस्तीच्या गावात बैठका घेऊन भविष्यातील संकटाची जाणीव लोकांना करून देण्यात येणार आहे. देवमाशांच्या उलटीबाबत योग्य तो प्रयोगशाळा तपासणी अहवाल येईपर्यंत तस्करी विषयक केसेस दाखल करू नयेत, यासंबंधी पोलीस कमिशनर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात यावे, असे यावेळी सांगण्यात आले.
या चिंतन शिबिरात अनेक ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने देवगड येथे होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी, नवीन लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेमध्ये कोकणातील राजापूर - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ मच्छिमार प्रतिनिधी म्हणून आरक्षित करण्यात यावा, तसेच कोकण किनारपट्टीतील दोन विधानसभा मतदारसंघ मच्छिमार प्रतिनिधी म्हणून आरक्षित करण्यात यावेत, कोकणात कोळीवाडे नसल्यामुळे मच्छिमारी व गाबीत वस्ती असलेली गावे 'मच्छिमारी गावे' म्हणून घोषित करण्यात यावीत, तेथील घरांना सीआरझेडची एनोसीची अट रद्द करावी, मासेमारी बंदी कालावधीमध्ये म्हणजेच १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्याच्या एकत्रित कालावधीसाठी मच्छिमार कुटुंबियांना त्यांचा चरितार्थ चालविण्यासाठी किमान रुपये २५ हजार सानुग्रह अनुदान देण्यात यावे, मत्स्यदुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेले ब्रिटीशकालीन मत्स्यदुषकाळाचे निकष बदलून नवीन निकष तयार करण्यात यावेत व त्यामध्ये पारंपारिक मच्छिमारांना मत्स्यदुष्काळाच्या कालावधीमध्ये नुकसान भरपाई मिळत नसल्याने पारंपारिक मत्स्य उत्पादनाची आकडेवारी विचारात घेतली जावी, कोकण किनारपत्तीवरील शासनाच्या जागा व आवारे स्थानिक गाबित मच्छिमारांना लिजवर भाडेतत्वाने देण्यात याव्यात, किनारपट्टीतील मच्छिमार तरुण तरुणीना रोजगार देण्यासाठी शासनाने सुरक्षित व मजबूत गझीबो किंवा पर्णकुटी उभारून प्रत्येक हंगामासाठी भाडेत्तत्वावर वापरासाठी द्याव्यात, गाबीत संघटनानी प्रत्येक विभागात स्वतंत्र 'गाबित युवक संघटना व गाबीत महिला संघटना' स्थापित कराव्यात, असे ठराव संमत करण्यात आले.
यावेळी गाबित समाजाचे भांडुप पश्चिमचे अध्यक्ष वामन आडकर, रायगड विभाग अध्यक्ष डॉ. अनिल पराडकर, देवगड अध्यक्ष संजय पराडकर, वडाळा विभाग अध्यक्ष गणेश ऊर्फ बंटी पाटील, पुणे अध्यक्ष संकेत कोळंबकर, मानखुर्द गोवंडी चेंबूर अध्यक्ष रामचंद्र सारंग, रायगड महिला आघाडीच्या सौ. आकांक्षा केळुस्कर, डोंबिवली महिला आघाडीच्या सौ. सुप्रिया सारंग, कांजूरमार्ग विभागाच्या सौ. प्रियांका खोबरेकर व सौ. प्रेरणा सरवणकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुजय धुरत यांनी आभार प्रदर्शन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)