मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांचा गटार बांधणी कामाच्या दर्जाबाबत बाबत आक्रमक पवित्रा.
मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांचा गटार बांधणी कामाच्या दर्जाबाबत बाबत आक्रमक पवित्रा.
मालवण | ब्यूरो न्यूज : खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनस्तरावर प्राप्त विकास निधीतून मालवण शहरात होणारे प्रत्येक विकास काम हे दर्जेदार असले पाहिजे. निकृष्ट कामे तसेच शहरातील गटार काँक्रिटीकरण कामांबाबत, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी मालवण नगरपरिषद सभेत नाराजी व्यक्त केली. यावेळी संबंधित कामांच्या तपासणीचे आदेशही देण्यात आले आहेत.
शासन स्तरावरून प्राप्त होणारा विकासनिधी जनहिताच्या दृष्टीने दर्जेदार कामांसाठीच खर्च झाला पाहिजे. निकृष्ट कामे होऊन निधी वाया जात असल्यास अशा कामांची तक्रार व चौकशी करून कारवाई केली जाईल. प्रशासन अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात भूमिका घेतली जाईल. प्रसंगी लोकशाही मार्गाने उपोषण करू, अशी भूमिका बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी मांडली.
या सभेदरम्यान, तक्रार प्राप्त कामांची तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे नगराध्यक्षा ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी सांगितले.
बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी मेढा मार्गावरील गटार बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले. मालवण नगरपरिषद जेई यांनी नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगराध्यक्षा यांच्या उपस्थितीत कामाची तपासणी करून पंचयादी घालावी. यात हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नर गटार बांधणे आणि मालवण शहर पिंपळपार ते लौकिक हॉटेल ते मौनिनाथ मंदिर राजकोट किनारपट्टीपर्यंत गटारावर लादी बसवणे या दोन कमांसोबत मालवण गोडावून रस्ता ते सारस्वत बँक रस्ता येथे पावसाळी पाणी निचरासाठी दुतर्फा आरसीसी गटार बांधणे या कामाची सुद्धा तपासणी होणे आवश्यक आहे. यासह रेडकर हॉस्पिटल ते स्टेट बँक मार्गांवरील गटार काँक्रिटीकरण कामाबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करत हे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सांगण्यात आले. तरी या कामाची सुद्धा साईट व्हिजीट करून दर्जा तपासला जावा, असे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले. सूचना देउन सुद्धा बांधकाम विभाग कर्मचारी ठेकेदाराचे हित जोपासत शासनाचे नुकसान करत आहेत. तरी संबधित कामाची व अधिकारी वर्गाची सखोल चौकशी व्हावी, असेही बांधकाम सभापती यांनी स्पष्ट केले.
बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांनी रेडकर हॉस्पिटल ते स्टेट बँक मार्गांवरील गटार काँक्रिटीकरण कामाची अधिकारी, ठेकेदार यांसह लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पाहाणी केली. त्यानंतर उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, स्वच्छता सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक ललित चव्हाण यांसोबत मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांची भेट घेऊन निकृष्ट कामांची तक्रार केली. यावेळी सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडिट होऊन त्याअगोदर कामांची तपासणी केली जाईल, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)