ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
सुधा सुधींद्र. ( मराठी कथा )

सुधा सुधींद्र. ( मराठी कथा )

प्रकाशन: 20 Jan 2025 07:57 AM
वाचन संख्या 85

रत्नागिरीत कोणी पडला तर त्याचा अण्णू गोगट्या व्हायचा, हे आपल्याला पुलंनी सांगितलेलं आहे. तसंच काहीसं आपापल्या घरी ‘सुधा सुधींद्र होणं’ असतं.

तो १९८९ चा आणि मोबाईल आणि अगणीत चॅनेल्सविरहीत जीवनाचा काळ होता. त्या दिवसांत माणसांच्या फ्रेंड रिक्वेस्टस् आमने सामने ॲक्सेप्ट होत असत. त्यावेळी बहुतांश जण समोरासमोर अनफ्रेंड होत असत अशा थेट मैत्रीच्या दुर्मिळ दिवसांत माझ्या आईबाबांची मैत्री एका दाक्षिणात्य सात्विक जोडप्याबरोबर जमली. त्यातील जे पती होते ते आमच्याच शहरातील एका बॅन्केत सहा महिन्यांकरिताच व्यवस्थापक म्हणून रुजू झालेले. भाषा हा थोडासा अडचणीचा विषय असल्याने ते जोडपं सर्वांसाठी बर्यापैकी अबोलच होतं. एकमेकांशी मात्र ते अथक बोलत असत. बरं, त्यांची रहाण्याची व्यवस्था माझ्या मित्राच्या घरांशेजारील त्याच्या भाड्याच्या खोल्यांमध्ये होती म्हणून आमचं जाणं झालं की ह्यांचे दाक्षिणात्य पण आजही न समजलेले हास्यविनोद ऐकताना गंमत वाटायची. ते जोडपं मंजुळ संवाद साधायचं. त्यांचे संवाद म्हणजे जणू एखादी संगितीका ऐकल्यासारखं होतं. म्हणजे सगळंच तालासूरांत वाटे. हसणं, बोलणं, चौकशी करणं ह्यामागे सतार छेडायला कोणी संगितकार कायमचा नेमलाय की काय अशी शंकाही यायची इतका मधुर संवाद ..! त्यातल्या मॅनेजर साहेबांचं नाव आता आठवत नाही पण त्या आंटींचं नाव आठवतंय. सुधा सुधींद्र….होय, असं नाव होतं आणि हे नाव का लक्षात राह्यलंय तेही सांगतो.

माझ्या आईवडिलांशी ह्या जोडप्याची मैत्री होती. एकदा त्यांनी आम्हाला डिनरला बोलावलं. जेवण व तेही ‘कोणीतरी बोलावलंय’, ह्या कल्पनेने संध्याकाळी खेळताना जरा जास्तच ताकद व ऊर्जा खर्च करुन, पूर्ण रिकाम्या पोटाने आणि सद्गदीत भावनेने आम्ही म्हणजे खासकरुन मी तयार झालो. रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात हे पाठांतर आता व्यवस्थीत झालं होतं. ते दूरदर्शनवरच्या महाभारत मालिकेचे दिवस होते. निवडणुक नुकतीच संपली होती आणि म्हणून निवडणुकीच्या दिवशी जे कोणी मालिका पाहू शकले नाहीत त्यांच्यासाठी रात्री आठ वाजता महाभारत मालिकेचं पुनःप्रक्षेपण व्हायचं होतं. डिनर करता करता महाभारताचा मागील एपीसोड पुन्हा व तोही रंगीत टी. व्ही. वर पहायच्या राजेशाही कल्पनेने मी फुल्ल फाॅर्मातच होतो. ठरल्याप्रमाणे आम्ही सुधा सुधींद्र ह्यांच्या पायर्यांवर रात्री आठच्या ठोक्याला हजर झालो. लिंबू रंगाची साडी, दाक्षिणात्य पद्धतीनं सजलेल्या व मायाळू हास्याच्या सुधा सुधींद्र आंटीनीच दरवाजा उघडला. स्वागत करताना आनंदाने ‘वेलकम’ म्हणलं. आम्ही आत गेलो. चंदनाची मस्त उदबत्ती आपलं जळून झिजण्याचं कर्तव्य मंदपणे निभावत होती. चंदनाचा वास आणि दाक्षिणात्यांचं घर अशा सोज्वळ स्थितीतही मला ‘वीरप्पन’ आठवला..! पण ते काहीतरी बोलायच्या आतच सुधा सुधींद्र व त्यांच्या पतीने माझ्या भावाशी इंग्लिशमध्ये संवाद साधायला सुरुवात केली. माझी आणि इंग्लिशची अत्यल्प ओळख होती. दोनचारदा इज, वाॅज ऐकलं की अरे ,’अपुनको भी ये आता है रे बाबा….,’ असं वाटायचं, पण ते तितकंच…!

बोलून झाल्यावर त्यांनी महाभारत लावलं. फार गंभीर एपीसोड सुरु होता. भीष्म पिताभह म्हणजे ते शक्तीमान नट मुकेश खन्ना, आक्रमक तेवरमध्ये पण करुणपणे काहीबाही समजावत होते. इकडे सुधा सधींद्र आंटीनं त्यांच्या नवर्याला,’ जेवणं घेऊया का?’ असा कटाक्ष टाकला. ते अंकलही लगेच डोळ्याने, ‘आलो ना’ म्हणत आत गेले. सुंदर असा पदार्थ गंध व फोडणीचा कढीपत्ती हिरवा रंगगंध खोलीत पसरला. त्यात किसलेल्या आल्याचं समर्पणही मस्त मिसळलं होतं. थोडीशी हळद तिची चिमूट दान केल्याची गंधभावना देत होती. आईबाबा आणि भावाने अगदी महत्प्रयासाने माझं तोंड व तोंडाला आलेलं पाणी डोळे वटारुन आवरतं ठेवलेलं होतं. आता अंकल पडदा सरकवत बाहेर आले. मी आता ‘बेटा हुआ या बेटी’, असे विचारणार्या नातेवाईकां सारख्या उत्कंठेत होतो.

अंकलनी टेबलमॅटस् लावली. मला ती टेबलमॅटस् वगैरे जरा नविनच होतं..! नंतर पाण्याचे दोन जार्स आणि लिंबाच्या फोडिची मोठ्ठी नक्षीदार वाटी घेऊन अंकल बाहेर आले. बास…! आता आपली यंत्रणा नियंत्रणाबाहेरच जाऊ लागली.
‘अरे….लाओ…जोभी है…अच्छाही होगा. सिर्फ देर मत करना….इंतहा हो गयी इंतजारकी……,’अशी अवस्था झाली माझी. आता अंकलही खुर्चीवर स्थानापन्न झाले. एक एक करुन सुंदरशीच पण रिकामी ताटं समोर ठेवली गेली.
तिकडे टि.व्हीतून भीष्म पितामह कोणालातरी सबुरीचा सल्ला देत होते. इकडे माझा भाऊ मला थ्री कोर्स जेवण म्हणजे काय व ‘हे’ तेच असणार असा ‘अजून सचिन तेंडुलकर क्रीझवर असल्याप्रमाणेचा’ दिलासा देत होता आणि ज्यांची वाट पहात होतो त्या सुधा सुधींद्र आंटी पडदा बाजुला करुन हसत हसत बाहेर आल्या…!
त्यांनी आईला , “शाॅल वुई ?”असं इंग्लिशमध्ये विचारलं. आईनेही उत्कंठा दाबत ..,”व्हाय नाॅट!” असं ॲटीट्युड वालं उत्तर दिलं.
मी इकडे वैतागलेलो. ‘अहो वाढायचं का…? इतक्यात दुसरा कोर्स सुरु झाला असता ,’ वगैरे असंख्य भहाभुकेले विचार माझ्यामनात थैमान घालत होते. सगळ्यांत माझे वडिल आणि अंकल मात्र कर्तेपुरुष असल्याने तटस्थ वाटत होते पण तितकेही नसावेत…!

एका स्वच्छ नॅपकिनने स्वच्छ कढईसदृष्य भांडं किंवा कढईच पकडून आंटी बाहेर आल्या. वासाबिसाची अपूर्वाई केंव्हाच संपलेली. आता तुटून पडायच्या इराद्यानेच जीभ आणिआतडी सज्ज होती. सुधा सुधींद्र आंटीही सोबत बसल्या.
‘अरे असं काय. ह्या फक्त कढई घेऊन आल्यात…!चपात्या, भात, कोशिंबीर, श्रीखंड.. वगैरे वगैरे कोण आणणार…अंकल..?अंकलकडे पाहीलं तर तेही खुर्चीत मस्त आणखीन ऐसपैस बसलेले. मग वाटलं बायका बायका मिळून आणतात तसलं काहीसं त्या आईलाच सांगतील. पण नाही.तसंही नाही..!

सुधा सुधींद्रनी शांतपणे कढईचं झाकण उघडलं.
अहाहा..! काय क्षण होता तो. आजही त्या वाफेतून सुखावत गेलेला तो अन्नगंध जशास तसा आठवतोय..!
त्यांनी हळूच झारा कढईत सरकवला. आतून छान लिंबू हळदी रंगाचा पदार्थ उचलून त्या प्रत्येक ताटात वाढू लागल्या.
तो पदार्थ ‘उपमा’ होता. आजपर्यंत केवळ उप्पीट खाल्लेल्या मला हा पदार्थ त्याच्या नावासकट आवडला. पूर्वी कधीही मी हळद घातलेलं उप्पीट किंवा उपमा खाल्ला नव्हता. आईही सुंदरच करायची पण रंग मात्र पांढरट असे. पण ते सुधा सुधींद्रंनी जे काय बनवलं होतं ते अवर्णनीयच होतं. बरं आता दुसरा कोर्स वगैरे येईल तेंव्हा तो चुकू नये म्हणून चवीचवीनं खाण्याऐवजी मी अधाशीपणाने बकाबक ते चारपाच घासांत संपवलं. नंतर रिकाम्या प्लेटीत चमचा वाजवत बसलो.
म्हणलं,’ आता आंटी अंदर जाएंगी दुसरा कोर्स लाएंगी….!’

अहो, त्या आंटीनी मला थेट बेसीनचा पत्ता दाखवला. आता माझ्यासकट आईवडिल व भावाला ‘जी नांदी होती तीच भैरवी आहे’, हे समजलं…! आईशपथ सांगतो माझा जो आतून जळफळाट झाला तो तसा आजतागायत कधी झालेला नाही.
कसनुसं हसत हसत मी त्यांच्या सोफ्यावर बसलो.

“ह्याला काय अर्थ…मग बोलवायचं कशाला….आणि जर उपमाच द्यायचाय तर तो अनलिमिटेड हवा ना…..इतक्या सुंदर चवीचा पदार्थ समोर ठेवायचा…व तोही इतकाच…..चाटला बाटला…कढई वगैरे चाटून खायची व लहान मुलांना सांगायची पद्धतही नसावी….छ्छ्या….., अशी माझी अन्याय झाल्यागतची अवस्था होती. आईबाबा आणि भावाला माझी स्थिती कळत होतीच पण ते हसू दाबुन सभ्य होते.

मी ‘टाटा…बाय बाय, सायोनारा’ वगैरे करायच्या मुडमध्ये नव्हतो. भरपूर खायचंय म्हणून जीव जाईपर्यंत खेळून मी आधीच दमलो होतो. सुधा सुधींद्र आंटी,” बरं वाटलं….छान पार्टी झाली….आता तुमच्या घरी एकदा करु पार्टी…!” वगैरे आईला सांगत टाटा करत होत्या आणि ते अंकल तर हाईटच, “तसा मी रात्रीचा जेवतच नाही…पण आज जाम टाईट झालंय पोट…!” वगैरे सांगत बाबांबरोबर चालत गेटपर्यंत शतपावलीला आले. इकडे माझं मन,”ओ अंकल…ह्याला जेवण म्हणतात का…काय राव शिवण मशीन द्यायच्या नावाखाली सुईदोरा देता का आम्हाला…काय शरमबिरम नाय….एवढे मोठे साहेब…..काय फायदा साधा वरण भात भाजीपण नाय…..हॅट “..असं आंदोलत होतं.

आईवर मी उगाचच तिची चूक असल्यासारखा चरफडत होतो. बाबांनाही हसू आणि भूक आवरत नव्हती.
भाऊ आपला उगीचच, “अशी उच्चवर्गीय माणसं व त्यांची स्टेटस डिनर्स स्टाईल कशी योग्य…”! वगैरेवर त्याचं ‘हमो मराठी’ वाचन, ज्ञान म्हणून पाजळत होता.

घरी आलो. आईने परिस्थिती ओळखत सरळ मुगाच्या डाळीची खिचडी करायला घेतली. दुसरीकडे भावाला पापड भाजायला सांगितले. बाबा मला कुशीत घेऊन गाणं म्हणत होते….,”दिल तडप तडप के कह रहा है आभी जा..तू हमसे आंख ना चुरा तुझे कसम है आभी….जा.!” ते बिचारे सहज गुणगुणत होते. मी त्यांच्यावर खवळलोच….! नंतर त्यांनी मौन धारण केले.

ते जेवण. आपलं खरंखुरं जेवणं येईपर्यंत.खिचडीला नावं ठेवणारे मी आणि बाबा त्या खिचडीनेच जे तृप्त झालो ते अवर्णयनी होतं.

तेंव्हापासून एखादा चांगला पदार्थ चाटला बाटला झाला म्हणजे कमी पडला तर आमच्या घरी त्या पदार्थाचा ‘सुधा सुधींद्र’ झालाय म्हणायची पद्धत आहे. पुढे ते जोडपं आमच्याकडे आलं तेंव्हा आईने सूप, दम आलू, फ्रेंच सॅलॅड, पापड, श्रीखंडपुरी, जीरा राईस वगैरेनी त्यांचा पाहुणचार केला. मी तेंव्हा आतुन त्यांच्यावर सटकलेलाच होतो…..!

सुधासुधींद्र व ते अंकल कोणात जास्त मिसळत नसत. कारण लळा लागून हळवं होणं त्यांच्या फिरतीच्या नोकरीच्या प्रकारालाही मानवणारं नसावं…! त्यांच्या उपम्याप्रमाणेच त्यांचा प्रत्येक गावातील मुक्काम ‘सुधा सुधींद्र’ असायचा.

आनंदाने दरवळणारा आणि अल्प…!

© लेखक : सुयोग पंडित.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स