विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग मनुष्य कल्याणासाठी व्हावा : शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख़.
‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेचे ऑनलाइन आयोजन
बाल विज्ञान परिषदेसाठी जिल्ह्यातील ९६ विद्यार्थ्यांचा सहभाग
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली सत्तावीस वर्षे ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ आयोजित केली जाते.या वर्षीची बाल विज्ञान परिषद ही ऑनलाईन स्वरुपात आहे. या उपक्रमात चालू वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग़ घेतला आहे. या सहभाग़ी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांसाठी जिज्ञासा ट्रस्ट ठाणे व शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, उपशिक्षणाधिकारी श्री.रामचंद्र आंगणे, जिज्ञासा ट्रस्ट राज्य अध्यक्ष श्री. सुरेंद्र दिघे, मार्गदर्शक तथा राज्य समन्वयक श्री. विश्वास कोरडे, श्री. अरविंद परुळेकर, श्री. सुरेश ठाकूर, जिल्हा समन्वयक श्री. गुरुनाथ ताम्हणकर, विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी डॉ. शेख़ म्हणाले, राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेतून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून घडतील. विज्ञानाच्या अभ्यासातूनच मानवी प्रगती होणार आहे.
उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी चौकस वृत्ती जोपासावी असे आवाहन केले. मार्गदर्शक श्री. सुरेंद्र दिघे आणि श्री. विश्वास कोरडे यांनी बाल विज्ञान परिषदेचा उद्देश, स्वरुप, वेगवेगळे प्रकल्प व त्यांची मांडणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना मुलभूत विज्ञानाची आवड निर्माण होणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
शालेय विद्यार्थ्यांना मुलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य अशा विविध चाचण्यातून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड केली जाते. राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ ठरलेल्या बाल वैज्ञानिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विज्ञान परिषदेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करावयाची संधी मिळते. त्याच बरोबर देशातील महत्वपूर्ण संशोधन संस्थांमध्ये संशोधन करण्याचा अनुभव सुद्धा मिळतो.
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा या वर्षीचा मुख्य विषय: “शाश्वत जीवनासाठी विज्ञान.”तर उपविषय शाश्वत जीवनासाठी परिसंस्था ,शाश्वत जीवनास योग्य असे तंत्रज्ञान, शाश्वत जीवनासाठी आराखडा- विकासकार्य व शाश्वत जीवनासाठी पारंपारिक ज्ञान असे आहेत.
सूत्रसंचलन व आभार गुरुनाथ ताम्हणकर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)