१५ दिवसांची डेडलाईन अन्यथा ग्रामस्थांसह आमरण उपोषण : तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापार्डेकर यांचा प्रसिद्धीपत्राद्वारे इशारा.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापार्डेकर यांनी तारकर्ली रस्त्यासंदर्भात संबंधित विभागाने गांभिर्याने कार्यवाही करावी असे सांगत आमरण उपोषणाला बसायचा इशारा एका प्रसिद्धी पत्राद्वारे दिला आहे. तारकर्ली मुख्य रस्ता खोदल्यामुळे गाड्यांचे छोटे मोठे अपघात होत आहेत असे सुरेश बापार्डेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले असून मालवण तालुक्यातील पर्यटन गांव जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवत असताना जो सुस्थितीत असलेला तारकर्ली रस्ता दोन्हीं बाजूंनी जल जीवन मिशन खात्याने खोदलेला आहे, तो त्वरित जसा होता त्याच सुस्थितीत येत्या १५ दिवसांत पूर्ण करावा अशी मागणी केली आहे.
तारकर्ली गावी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाच्या नेव्ही – डे निमित्त औचित्य साधून व मालवण मध्ये छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याकरिता आले होते. त्यावेळी त्यांचे आगमन तारकर्ली समुद्र किनारी जर झाले तर त्यांना तारकर्ली गावाचे रस्ते अगदी टापटीप मेकअप केल्यासारखे दिसून यावेत असा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांनी त्वरित बनविला होता. त्या कार्यक्रमाची सांगता करण्यास आलेले देशाचे आणि राज्याचे मंत्री महोदय खूश व्हावे याकरिता तात्पुरती तारकर्ली रस्त्याची मलमपट्टी करून त्यांच्या सोबत तारकर्ली वाहन चालकांना पर्यटकांना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना काही दिवसांसाठी आनंदी समाधानी करून या सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी स्वतःचेही समाधान केलं अशी उपरोधिक खंत सुरेश बापार्डेकर यांनी व्यक्त केली आहे. परंतु त्या नेव्ही डे कार्यक्रम नंतर काही दिवसातच जलजिवन मिशन यांना रस्ता खोदण्यासाठी परवानगी दिली गेली त्यांनी तो रस्त्याच्या दोन्हीं बाजूंनी खोदलेला रस्ता पूर्ववत न करता दोन्ही बाजूचा रस्ता कित्येक महिने तसाच अपूर्ण ठेवला. त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते एकमेकांकडे बोट दाखवत म्हणतात की हे काम आमचं नाही. अशा कारभाराचा नागरिकांना मनस्ताप होत आहे. छोट्या मोठ्या गाड्यांना त्यांनी खोदलेल्या खड्यांच्या वाळूत रुतल्याने छोटे मोठे अपघात होऊन नुकसान होत आहे. या सगळ्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग की जल जीवन मिशन विभाग याबाबत नागरिक आणि ग्रामस्थ यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. श्री देवी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर रस्ता काही वर्षांपूर्वी बनविला आणि तोच रस्ता मुदतीपूर्वी डांबरीकरण आणि क्रॉक्रीट केलेलं नादुरस्त झाला असता तो बनून घेण्याची सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांनी न दाखविता त्या ठेकेदारास पाठीशी घातले. तारकर्ली रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला लावलेल्या लाईट ब्लॉक मुळे रस्त्याला इतकी शोभा आलेली यावरून कित्येक वर्षे अशा प्रकारचां तारकर्ली रस्ता झालाच नाही असा रात्री अपरात्री ये जा करणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना भुरळ पडलेली असा तारकर्ली रस्ता होता आता तोच रस्ता खोदून रस्त्याची दुरवस्था केली गेली आहे. यावरून असे वाटते की तारकर्ली गावी देशाचे पंतप्रधान, राज्याचे मंत्रीमहोदय महिन्यातून एक फेरी मारली तरच प्रत्येक गावचे काय तालुक्याचे काय जिल्ह्याचे रस्ते सुरळीत गुळगुळीत असतील आणि सर्व समाधानी होऊन चालतील .वाहने न डगमगता रस्त्यावर चालवतील. पुढे पावसाळा येत आहे आणि आता होत आहे त्यापेक्षा जास्त अपघात आणि मनस्ताप वाहन चालक वाहन आणि नागरिकांना होऊ नये याकरिता आपण १५ दिवसांची डेड लाईन दिली आहे नंतर कोणतीही सबब, कारण आणि कोणाचेही ऐकून घेतले जाणार नाही असे सुरेश बापार्डेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.
या तारकर्ली रस्त्याचे उत्तम खडीकरण करून हॉट मिक्स डांबरीकरण जशास तसे येत्या पंधरा दिवसात पूर्ण झाले नाही तर तारकर्ली बंदर येथे मी आणि ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार याची आगाऊ सूचना आपण संबंधित विभागाला देत आहोत असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुरेश बापर्डेकर यांनी नमूद केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)